MLC Election : मातोश्रीपासून विधानभवनापर्यंत ठाकरेंचे राईट हॅन्ड नार्वेकरांनी बाजी मारली

MLC Election : मातोश्रीपासून विधानभवनापर्यंत ठाकरेंचे राईट हॅन्ड नार्वेकरांनी बाजी मारली

Maharashtra Vidhan Parishad Elections 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी परीक्षेच्या ठरणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आले आहेत. मतांची फारशी फाटाफूट न होता मविआ आणि महायुतीने दिलेले उमेदवार विजयी झाले आहेत. पण, एकच उठून दिसणारा बदल या निवडणुकीत घडला आहे. उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव आणि अत्यंत विश्वासू मिलींद नार्वेकर आता (Milind Narvekar) आमदार झाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत. तर शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडणुकीत असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला आहे.

उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क झाले होते. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले होते. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार होती. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती होती. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले होते. मतदानाच्या दिवशी म्हणजे आज या आमदारांनी हॉटेलातून थेट सभागृह गाठले.

राजकीय वनवास संपला! अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार; विधानपरिषदेत मारली बाजी

या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले होते. सर्वाधिक चुरस असलेल्या जागेवर ठाकरे गटाने मिलींद नार्वेकरांना उतरवले होते. ठाकरे गटाकडे विधानसभेत 15 आमदार आहेत. एक अपक्ष आमदाराचंही पाठबळ ठाकरेंना होतं. निवडून येण्यासाठी उमेदवारांना 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. परंतु, ठाकरे गटाकडे स्वतःची फक्त 16 मते होती. नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी सात मतांची गरज होती.

दुसरीकडे काँग्रेसकडे 37 मते होती. यातील आवश्यक मते नार्वेकरांना देण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न केले जात होते. या निवडणुकीत काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना तिकीट दिले होते. त्यामुळे त्यांची 23 मते वजा जाता काँग्रेसकडे अतिरिक्त 14 मते शिल्लक राहिली. याच मतांवर ठाकरेंची मदार होती. ही मते शिवसेनेकडे वळवण्याची मोठी कसरत होती. परंतु, यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले हेच या निकालावरून दिसून येत आहे.

उद्धव ठाकरेंचे प्रयत्न अन् नार्वेकरांचा विजय

मिलींद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आणणे उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई होती. आज मतमोजणीच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजताच उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बसून त्यांनी सर्व सूत्रे हलवली. काँग्रेसचे जे आमदार फुटण्याची शक्यता होती त्या आमदारांशीही संवाद साधला. उद्धव ठाकरेंच्या या प्रयत्नांमुळे मिलींद नार्वेकरांचा विजय सुकर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube