Download App

Ground Zero : आता अजितदादाच शिवतारेंना पुन्हा ‘आमदार’ करणार?

पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे विरुद्ध काँग्रेसचे संजय जगताप अशी लढत होणार आहे.

2019 ची विधानसभा निवडणूक. सासवडच्या पालखी तळावरुन अजितदादा गरजले. “अरे विजय शिवतारे, तू यंदा निवडून कसा येतो, तेच बघतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर एखाद्याला आमदार होऊच देत नाही…” निकालात शिवतारे पराभूत झाले. त्यांना या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी मिळाली ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत. “मी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार म्हणजे करणारच. बारामतीचा बिहार झालाय. पवाररुपी नावाची झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध सुरू केले आहे. मी निवडणूक लढविणारच. कोणीही मनात शंका ठेवू नका” असे म्हणत शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजितदादांचे टेन्शन वाढवले होते.

जिवाचा आटापिटा करत, पवारांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम विजयबापूंनी सलग 15 दिवस राबवला. पवार विरोधक म्हणून ओळख असलेल्या थोपटे कुटुंबियांना भेटले. इंदापूरात दौरा केला. वातावरणनिर्मिती अशी केली की शिवतारे हे अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात लढणार म्हणजे लढणारच. विजयबापूंना शांत करण्यासाठी, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजितदादांना त्याच सासवडच्या पालखी तळावर यायला लागले. किंबहुना बापूंनी त्यांना यायला भाग पाडले. अजितदादांकडून त्यांनी आगामी विधानसभेचा शब्द घेतला. या कथित बंडाने 2024 चे राजकीय इप्सित साध्य झाले. तब्बल साडे चार वर्षांनंतर त्यांच्या मनातील आगही शांत झाली.

आता या विधानसभेला महायुतीकडून शिवतारे आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) हे उमेदवार असतील नक्की आहे… पण यात अजितदादा काय भूमिका घेणार? दिलेला शब्द पाळणार का? भाजपही शिवतारे यांना मदत करणार का? संजय जगताप यांच्यासाठी कसे आव्हान असणार आहे? (Vijay Shivtare of Shiv Sena will fight against Sanjay Jagtap of Congress in Purandar assembly constituency)

पाहुयात लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून…

पुरंदर या ऐतिहासिक मतदारसंघावर कधीकाळी समाजवादी विचारांचा प्रचंड पगडा होता. 1972 ते 1999 या दरम्यान तब्बल सहावेळा दादा जाधवराव हे ज्येष्ठ समाजवादी नेते निवडून आले होते. शरद पवार यांनी जाधवराव यांना पराभूत करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. 1980 मध्ये संभाजी कुंजीर यांच्या रुपाने एकदा यात यश आले होते. पण बारामतीच्या शेजारचा मतदारसंघ जिंकता येत नसल्याची पवार यांना सातत्याने बोचत होती. पवार यांना दुसऱ्यांदा पुरंदर काबीज करण्यात यश आले ते 2004 मध्ये. 63 हजार मते घेत अशोक टेकवडे यांनी दादा जाधवराव यांचे आव्हान मोडीत काढले. 2009 मध्येही टेकवडे आमदार असल्याने पक्ष पुन्हा त्यांनाच उमेदवारी देणार हे पक्के होते. पण छगन भुजबळ यांच्या ओबीसी उमेदवाराच्या आग्रहातून दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी मिळाली.

याच काळात राष्ट्रवादीत पुरंदर तालुक्याच्या दृष्टीने आणखी काही महत्वाच्या गोष्टी घडत होत्या. मुळचे बांधकाम व्यावसायिक असलेले विजय शिवतारे 2000 च्या आसपास राजकारणात आले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी काम सुरु केले. पण नवी मुंबई महापालिकात ते दोनवेळा अपयशी झाले. अखेर छगन भुजबळ यांच्या सल्ल्याने शिवतारे पुरंदरला परतले होते. गावी आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचेच काम सुरु केले. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे नाव पुरंदर-हवेलीच्या घराघरात पोहचले. राजकारणात झटपट यश कसे मिळवायचे, याचे कौशल्य व्यवसायामुळे त्यांना आत्मसात झाले होते. शरद पवार, अजित पवार यांच्याशी संपर्कात राहून पुरंदरची आमदारकी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पण राष्ट्रवादीतून तिकिट मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Ground Zero : कुल-थोरात जोडीचं राजकारणच संपणार? दौंडमध्ये तिसऱ्या भिडूचा उदय

त्यावेळी या मतदारसंघात शिवसेना वाढविणे सोपे काम नव्हते. 1995 मध्ये राज्यात सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेला पुरंदरमध्ये अवघी 1700 मते होती. 1999 मध्ये 7 हजार आणि 2004 साली 32 हजार मते होती. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवतारे यांनी करुन दाखविले. त्यांनी या मतदारसंघावर पहिल्यांदाच भगवा फडकवला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वर्षभरात त्यांनी पक्षाची ताकद वाढविली होती. शिवतारे यांना तब्बल 68 हजार मते मिळाली. इथे त्यांना संजय जगताप यांच्या बंडखोरीचाही फायदा झाला. 2014 मध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढले. राष्ट्रवादीने पुन्हा टेकवडे यांना तर काँग्रेसने संजय जगताप यांना तिकीट दिले. पण याच मतविभागणीचा फायदा घेत शिवतारे दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या इतके जवळ गेले की त्यांनी फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळवले, सातारचे पालकमंत्री झाले.

पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. शिवतारे यांनी हा प्रश्न दोन्ही निवडणुकीचा प्रमुख मुद्दा केला होता. अजित पवार यांच्यावर पुरंदरच्या पाण्याचे आरोप करत त्यांना हैराण केले होते. शिवाय गुंजवणी प्रकल्प, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण, कॅनेल मधून शेतकऱ्यांना पाणी आदी योजना मतदार संघात आणल्या. आठ-दहा वर्षांपासून येथील शेतकरी पैसे भरून पाणी घेऊ लागले. जिरायती जमीन बागायत झाल्या. शेतात पाणी आले, शेततळी भरली. सासवड परिसरात शेतकऱ्यांनी फळबागा फुलल्या. पडीक जमिनी वहिवाटीखाली आल्या.

2014 च्या निवडणुकीवेळी शिवतारे यांनी अजितदादांचा एका वादग्रस्त वक्तव्याचा हवाला देत त्यांना बारामतीचा टग्या ही उपमा दिली. तेव्हापासून अजितदादा आणि शिवतारेंमध्ये वैयक्तिक वैर सुरु झाले. यातूनच 2019 मध्ये अजितदादांनी ठरवून त्यांचा पराभव केला. काँग्रेसचे संजय जगताप तिसऱ्या निवडणुकीत आमदार झाले. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवतारे आणि जगताप एकत्र आले होते. पण त्यांचे एक दिवस देखील जमले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात बंड करताच शिवतारे शिंदे यांच्या मदतीला धावून गेले. शिंदे यांनीही त्यांना शिवसेनेत मुख्य प्रवाहात आणले, काम करण्याची संधी दिली. ताकद दिली. इतकी की यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवतारेंनी अजितदादांचाही वचपा काढला.

Ground Zero : अजितदादांनी विडा उचललाय पण थोपटेंचा गड सर करणं सोपं नाही…

आता महायुतीत नैसर्गिकरीत्या ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवतारे हेच इथे उमेदवार असतील असे दिसते. शिवतारे यांनीही संपर्क आणि गावभेट दौरा सुरू केला आहे. पण भाजपमध्येही चार जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार अशोक टेकवडे, पुरंदर-हवेली विधानसभाप्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्याकडून उमेदवारीवर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांचीही विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. जालिंदर कामठे हेसुद्धा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे कामाला लागले आहेत. दुर्गाडे यांनी पुरंदर पूर्व भागात गावभेट दौरे सुरू केले आहेत.

आज घडीला पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत. त्यामुळे ‘ज्याचा आमदार त्याची जागा’ या सुत्रानुसार महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार आणि जगताप हेच उमेदवार असणार हे स्पष्ट आहे. पण दुसरा युवा चेहरा दत्ता झुरंगे हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर झुरंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार संजय जगताप यांचा विश्वास संपादन केला. तिथून ते पंचायत समिती सदस्य, नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय जगताप यांच्याविरोधातच त्यांनी दंड थोपटल्याचे पाहावयास मिळते.

शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षही या मतदारसंघावर दावा करण्याच्या तयारीत आहेत. माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यामुळे मतदारसंघातील काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. झेंडे यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत. स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. “किती दिवस दुसर्‍यांचा प्रचार करणार?” असा प्रश्न करत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या निर्णयापर्यंत ते आले आहेत. हवेलीतील शिवसेना (उबाठा) पक्षाचे शंकरनाना हरपळे हेही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

यंदाच्या निवडणुकीत पुरंदर मतदारसंघातील काही प्रश्नही गाजण्याची शक्यता आहे. पुरंदर येथील जागा विमानतळासाठी निश्चित झाली आहे. पण, हाच मुद्दा नेमका या विधानसभेच्या निवडणुकीत कळीचा बनेल, असे चित्र आहे. बारामतीतील सुपे परगणा या दुष्काळी भागाला नीरा नदीतून एक्स्प्रेस वाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी सातत्याने होत आहे. गुंजवणी धरणातून पुरंदर तालुक्यासाठीची पाणीयोजना रखडली आहे. ती तातडीने मार्गी लावण्याची मागणी आहे. भोर तालुक्यातील उत्रोली औद्योगिक वसाहतीचा मुद्दा, पुरंदरमधील दिवे भागात राष्ट्रीय शेती बाजार स्थापन करण्याचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. याशिवाय नीरा गावातील ज्युबिलंट कंपनीत ॲसिडिक अनहायड्राइडचा प्रकल्प सुरू आहे. त्यातून वरचेवर वायु गळती होत असते. यात नाहक जीव जातात, जखमी होतात. त्यामुळे कंपनीतील प्लॅंट बंद करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यासाठी वारंवार आंदोलनेही केली जातात.

आता यंदाच्या विधानसभेला नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार आणि या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी पुरंदरची जनता कोणाला निवडणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us