एकच छंद, गोपीचंद… भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांनी प्रसिद्ध केलेले हे वाक्य. बोलण्याची लकब, आक्रमक शैली, योग्य शब्द फेक यामुळे पडळकर यांच्या रूपाने एक पठडीचा वक्ता भाजपला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून ज्या मोजक्या आमदारांना ओळखले जाते त्यापैकी पडळकर एक.
राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, जयंत पाटील, रोहित पवार या नेत्यांना थेटपणे अंगावर घेतात. जे फडणवीस बोलू शकत नाहीत ते पडळकर बिंधास्तपणे बोलतात. याचेच फळ म्हणून त्यांना भाजपने जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. पण सुरूवातीपासूनच त्यांना महाविकास आघाडीसोबतच भाजपमधूनही विरोध झाला. त्यानंतरही त्यांनी तब्बल 38 हजार मतांनी जतचे मैदान मारलेच. आता निकाल लागून अवघे दोन महिने झाले असतानाच पडळकर यांनी विरोधकांचा अगदी अलगद काटा काढला आहे… (Vilas Jagtap and Tamangowda Patil have been expelled from the BJP on the recommendation of Gopichand Padalkar.)
महाराष्ट्राच्या सत्ताकारणात धनगर समाज महत्त्वाचा घटक मानला जातो. धनगर समाजाची एक व्होट बँक मानली जाते. विविध राजकिय पक्ष ती आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नशिल असतात. यात सांगली जिल्ह्यातील धनगर समाज राजकिय दृष्ट्या अधिक जागृत असल्याचं दिसून येतं. यातही जत तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. याचमुळे या भागात धनगर समाजातील काही नेते तयार झाले आणि निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी देखील झाले. 1962 साली जतमधील धनगर समाजाची संख्या लक्षात घेऊन काँग्रेसने तासगाव तालुक्यातील टी. के. शेंडगे यांना जतमधून उमेदवारी दिली. शेंडगे निवडूनही आले. त्यांच्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीला प्रकाश शेंडगे भाजपच्या तिकीटावर जतमध्ये उभे राहिले व विजयी झाले. आता गोपीचंद पडळकरही मुळचे आटपाडी तालुक्यातील असताना जतमधूनच आमदार झाले आहेत.
मात्र जतमधून आमदार होणे पडळकर यांच्यासाठी सोपे नव्हते. आटपाडी तालुक्यात नसलेली स्पेस ओळखून त्यांनी सहा वर्षांपूर्वीच आपला मोर्चा जतकडे वळवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच प्रस्थ तयार झाले. त्यावेळी त्यांनी जतमधून तब्बल 53 हजार मते घेतली. पुढे 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून लढवली. त्यात पराभूत होणार हे त्यांनाही माहिती होते, पण त्यानंतर ते विधानपरिषदेवर गेले. तिथपासूनच त्यांनी जत तालुक्यात तयारीला सुरूवात केली. या तयारीमुळेच मागच्या पाच वर्षांत सातत्याने इथले स्थानिक भाजप नेते विरूद्ध पडळकर असा संघर्ष उभा राहिला. यात पडळकर विरुद्ध माजी आमदार विलासकाका जगताप आणि माजी सभापती तमनगौडा रवी पाटील आघाडीवर होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पडळकर यांच्या उमेदवारीची भाजपच्या संजयकाका पाटील यांना उघड मदत झाली होती. त्यामुळे संजयकाका पाटील यांनीही पडळकर यांना पुरक भूमिका घेण्यास सुरूवात केली. याच संघर्षातून आधी विलासकाका जगताप यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली. त्यांनी थेट अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर झालेल्या विधानसभेला माजी सभापती तमनगौडा रवी पाटील जतमधून इच्छुक होते. त्यांनी भूमि पुत्र विरुद्ध बाहेरचे असे म्हणत पडळकरांविरोधात मोहीमच सुरू केली. पडळकर हे भूमीपूत्र नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी नको असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी जतमधील भाजपा नेत्यांनी थेट मुंबईत धडक देत पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यात माजी आमदार विलासराव जगताप हे आघाडीवर होते. पण पक्षाने पडळकर यांन तिकीट जाहीर केले. त्यामुळे चिडून पाटील यांनी बंडखोरी केलीच. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील जतमध्ये गेले. पण बंडखोरी थांबली नाही.
तमनगौडा रवी पाटील यांच्या उमेदवारीला विलास जगताप यांचेही पाठबळ मिळाले. त्यामुळे काँग्रेसचे विक्रम सावंत विरूद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर विरुद्ध अपक्ष तमनगौडा रवी पाटील अशी तिरंगी निवडणूक झाली. या तिरंगी निवडणुकीत पक्षाचे स्थानिक नेते सोबत नसतानाही पडळकर यांनी तब्बल 38 हजार मतांनी बाजी मारली. आता या निकालाच्या दोन महिन्यांनंतर पडळकर यांनी या बंडखोरीचा बदला घेतला आहे. विलास जगताप आणि तमनगौडा पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश सचिव धनंजय कुलकर्णी यांनी ही कारवाई केली असली तरी यासाठी पडळकर यांची शिफारस असणार हे उघड आहे. तमनगौडा रवी पाटील यांनीही या कारवाईमागे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचाच उद्योग असल्याचा आरोप केला आहे.
आता तमनगौडा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या कारवाईविरोधात दाद मागणार असल्याचे म्हंटले आहे. त्यात आता त्यांना यश येणार का? या दोघांवरील कारवाई फडणवीस मागे घेणार का? की पुन्हा एकदा ते गोपीचंद पडळकर यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभे राहणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. फडणवीस काय करतील तुम्हाला काय वाटत? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.