येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन, गोदा तटावर महाआरती, पदाधिकाऱ्यांचे शिबिर आणि जाहीर सभा अशा सगळ्या भरगच्च कार्यक्रमातून ते दोन दिवस नाशिक मतदारसंघात पुन्हा मोर्चेबांधणी करणार आहेत. तर त्याचवेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही इथून चाचपणी सुरु केली आहे.
दुसऱ्या बाजूला महायुतीमधून सिटींग खासदार या सुत्राप्रमाणे हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित असल्याचे मानले जात आहे. पण भाजपनेही दोन वर्षांपासून इथून तयारी सुरु केली आहे. पण तुर्तास तरी गोडसे यांनी आपली यंत्रणा फुल फोर्सने अॅक्टिव्ह केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आगामी लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
याच सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघात काय घडू शकते? कोण उमेदवार असू शकतात याचा लेट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा.
नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, देवळाली, सिन्नर आणि इगतपुरी असा ग्रामीण आणि शहरी या दोन भागात नाशिक लोकसभा मतदारसंघ विभागला गेला आहे. परिणामी कागदावर सोपा वाटणारा हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या आणि वैचारिक दृष्ट्या अवघड दिसून येतो.
याचमुळे कधी काँग्रेस, कधी शेकाप, कधी भाजप, कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादीचा खासदार इथून निवडून गेला आहे. शिवाय 1971 सालचा एक अपवाद वगळल्यास एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही, असाही एक समज या मतदारसंघात रुढ झालेला आहे.
मात्र हाच समज मोडित काढत शिवसेनेकडून हेमंत गोडसे 2014 आणि 2019 असे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. त्यानंतर आता ते तिसऱ्यांदा मैदान मारण्यासाठी आणि विरोधी उमेदवाराला आस्मान दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.
1996 मध्ये युतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यानंतर 1996, 1999, 2014 आणि 2019 मध्ये इथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या खात्यात होती. 2004 साली देविदास पिंगळे आणि 2009 साली समीर भुजबळ यांच्या रुपाने राष्ट्रवादीनेही इथून झेंडा फडकवला आहे. म्हणजेच नाशिकमध्ये मागील 5 लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पाहायला मिळाला. आता हेच परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांचे मित्र झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी इथून आपली ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरे-पवार गटाच्या जोर-बैठका :
वर्षभरापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून राऊत यांचे या मतदारसंघात दौरे वाढले आहेत. अशात ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन आणि केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यातबंदी या प्रश्नांमुळे ठाकरेंच्या गटाला नाशिकमध्ये आयते कोलित मिळाले. या दोन्ही मुद्द्यांवरुन ठाकरे गटाने इथून रान उठवले.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीत शरद पवार यांनी कांद्याच्या प्रश्नाला पुढे करुन नाशिकमध्ये लोकसभेसाठी चाचपणी सुरु केली आहे. त्यांचा नुकताच नाशिक दौरा पार पडला. आतापर्यंत छगन भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीला नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे कोणतेही टेन्शन नव्हते. पण आता भुजबळ अजितदादांच्या गटात गेल्याने शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
भुजबळांनंतर पवारांचा शिलेदार कोण?
माजी खासदार देविदास पिंगळे यांचे बंधू आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांना तयारी सुरु करण्याचे आदेश शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी दिले असल्याचे बोलले गेले होते. त्यांना ताकद देण्यासाठी नुकतेच्या त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदी सोपविण्यात आले आहे. पण तरीही आता हा मतदारसंघ पवार गटाकडे गेल्यास त्यांच्याकडे भुजबळांची कमतरता भरुन काढेल असा कोणताही नेता सध्यातरी चेहरा दिसून येत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
ठाकरेंचा कोणता वाघ गोडसेंना आव्हान देणार?
ठाकरेंच्या बाबतीत मात्र हे चित्र काहीसे वेगळे आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या रुपाने ठाकरेंकडे तगडा पर्याय असल्याचे दिसून येते. शिवसेनेचा नाशिक लोकसभा मतदारसंघात एकही आमदार नसला तरीही संघटनेची बांधणी पक्की आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांसोबतच सिन्नर, देवळाली आणि इगतपुरी इथे शिवसेनेची मोठी ताकद राहिली आहे. यापूर्वी या तिन्ही मतदारसंघांमधून शिवसेनेचे आमदार निवडून गेले आहेत.
आता मात्र शिवसेनेतील दुफळीनंतर नेमकी किती ताकद विभागली गेली हे आकडेवारीत मांडणे तसे जिकीरीचे ठरु शकते. पण करंजकर यांच्यासारखा चेहरा दिल्यास ठाकरेंना पुन्हा मतदारसंघ ताब्यात घेण्याची संधी मिळू शकते. याशिवाय ठाकरे गट बाहेरुन उमेदवार आयात करण्याचीही योजना आखत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते आयात उमेदवार म्हणजे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मानिकराव कोकाटे.
कोकाटे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. 2019 मध्येही त्यांनी राष्ट्रवादीतून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला पण त्यांनी तब्बल एक लाख 34 हजार मते घेतली होती. कोकाटे यांच्याशी सध्या याबाबत चर्चा सुरु असल्याचीही माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गोटातून मिळत आहे.
नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. यात नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिममधून सिमा हिरे आणि नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे आमदार आहेत. तर सिन्नर आणि देवळालीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार आहेत. इगतपूरी हा एकमेव मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. याच ताकदीच्या जोरावर भाजपनेही नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकण्यास सुरुवात केली आहे.
भाजपने दिनकर पाटील यांच्या रुपाने दोन वर्षापासूनच मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या आजवरच्या कार्याचे प्रतिबिंब मांडणारे व्रत सेवेचं या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक त्यांनी लोकसभेच्या सहाही मतदारसंघात वाटले होते. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हा मतदारसंघ कोणाकडे जाणार असे सांगत सस्पेन्स ठेवला होता.
मात्र सद्यस्थितीमध्ये तरी हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे चित्र आहे. याचे कारण गोडसे यांनी मुळात शिंदे गटात जाण्याची रिस्क घेतली तीच उमेदवारीची खात्री करुन आणि मतदारसंघातील अंदाज घेऊन. त्यामुळे आता तर त्यांना डावलून जागा भाजपकडे गेल्यास भाजपबद्दल चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता नेमके या मतदारसंघात काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.