Download App

काँग्रेस संपवणार चव्हाणांचं राजकारण? लेक श्रीजयाविरोधात तगडी फिल्डिंग

  • Written By: Last Updated:

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे पक्षांतर हा चर्चेचा विषय ठरला. नांदेडसह (Nanded) मराठवाड्यातील बहुतांश जागांची समीकरणे डोक्यात ठेवून भाजपने (BJP) अशोक चव्हाण यांच्यासाठी पायघड्या घातल्या, त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. पण ना भाजपला मराठवाड्यात यश मिळाले, ना नांदेडमध्ये. इतकेच काय तर अशोक चव्हाण यांना स्वतःच्या भोकर विधानसभा मतदारसंघातूनही भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना मताधिक्य देता आले नाही.

आता विधानसभा निवडणुकीला याच भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाण यांची तिसरी पिढी राजकारणात येऊ पाहत आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीच्या तयारी लागल्या आहेत. त्यामुळे आता श्रीजया यांच्याविरोधात महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) रणनीती काय असणार? तुल्यबल उमेदवार म्हणून कोण रिंगणात उतरणार? कोणाच्या नावाची चर्चा आहे? (Who will be the Mahavikas Aghadi candidate against BJP’s Srijaya Chavan in Bhokar Assembly Constituency?)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

नांदेड आणि चव्हाण कुटुंबिय ही समांतर चालणारी ओळख. शंकरराव चव्हाण यांनी अतिशय कष्टाने नांदेडला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवले. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री बनले. नांदेडमधील भोकर मतदारसंघातील मतदारांनी चव्हाण यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यानंतर चव्हाण लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या जागी 1980 आणि 1985 मध्ये बाबासाहेब देशमुख (गोरठेकर), 1990 आणि 1995 मध्ये माधवराव किन्हाळकर हे आमदार म्हणून निवडून आले. 1999 मध्ये आघाडीमध्ये भोकर मतदारसंघ भारीप बहुजन महासंघाला सुटला. गोरठेकर यांनी अपक्ष उडी घेतली आणि विजयही मिळविला. त्यावेळी किन्हाळकर शरद पवार यांच्या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढले होते. 2004 मध्ये श्रीनिवास देशमुख आमदार झाले.

दुसऱ्या बाजूला 1984 मध्ये शंकरराव चव्हाण नांदेडमधून लोकसभेवर निवडून गेले होते. पण अचानक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे मुख्यमंत्रीपद गेले आणि शंकरराव चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्राची कमान सोपविण्यात आली. ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. त्याचवेळी राजकारणात एन्ट्री झाली ती अशोक शंकरराव चव्हाण यांची. 1987 च्या पोटनिवडणुकीत वडिलांच्या जागेवर चव्हाण सहज निवडून आले. वयाच्या 30 व्या वर्षी खासदार झाले. त्यानंतर 1992 मध्ये ते विधानपरिषदेवर गेले. 1993 साली सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह राज्यमंत्री म्हणून ते सरकारमध्ये सामील झाले. 1999 आणि 2004 असे दोन टर्म ते मुदखेड मतदारसंघातून सहज निवडून आले. या काळात ते मंत्रीही झाले. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रिपद गेले. हायकमांडने मुख्यमंत्रीपदाची माळ अशोक चव्हाणांच्या गळ्यात टाकली.

अमित देशमुखांना देवघरातूनच आव्हान? अर्चना पाटील चाकूरकर टफ ठरणार?

2008 मध्ये अशोक चव्हाण लढत असलेला मुदखेड मतदारसंघ गायब झाला. अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तालुक्यांसह जुन्या भोकर मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण येथून सहज निवडून आले. त्यांच्याविरोधात डॉ. माधवराव किन्हाळकर अपक्ष रिंगणात उतरले होते. तेव्हा विधानसभा निवडणुकीत ‘अशोकपर्व’ ही पुरवणी चव्हाण यांनी काढली होती. पेड न्यूजवरून ते वादात अडकले होते. पण चव्हाण हे लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. किन्हाळकर यांना अवघे 13 हजार 346 मते मिळाली होती. तर चव्हाण यांना एक लाख 20 हजार 849 मते मिळाली होती. अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात राज्यातही काँग्रेसला चांगले यश मिळाले. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.

मात्र अचानक आदर्श सोयायटी घोटाळ्याचे चव्हाणांवर आरोप झाले. त्यातच त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. 2014 मध्ये ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले. मोदी लाटेतही अशोक चव्हाण निवडून आले. त्यावर्षी विधानसभा निवडणुकीला भोकर मतदारसंघातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना तिकीट दिले. त्याही सहज निवडून आल्या. त्यांच्याविरोधात जुने काँग्रेसचे नेते माधवराव किन्हाळकर यांनाच भाजपने मैदानात उतरविले होते. पण त्यांचा निभाव लागला नाही. अमिता चव्हाण यांना 1 लाख 781 मते मिळाली होती. तर किन्हाळकर यांना 53 हजार 224 मते मिळवता आली होती.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला. भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकरांनी चव्हाण यांना पराभूत केले. राजकारणात अपराजित असलेल्या चव्हाणांना पहिला पराभव पाहावा लागला. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण सहज निवडून आले. त्यांनी भाजपच्या बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठा पराभव केला. चव्हाण यांना 1 लाख 40 हजार 559 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब देशमुख-गोरठेकर यांना 43 हजार 114 मते मिळाली होती. 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्रीही झाले.

Ground Zero : धीरज देशमुखांना रमेश कराड नडणार की पुन्हा पडणार?

अलिकडेच लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही त्यांच्यासाठी पायघड्याच घातल्या. प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशी भाजपने त्यांना राज्यसभेवर खासदार केले. अशोक चव्हाण बरोबर असल्यास नांदेड, हिंगोली, लातूर आणि परभणी या आजूबाजूच्या मतदारसंघातील खासदारही सहज निवडून येतीलअसे भाजपला वाटत होते. पण जरांगे फॅक्टरने भाजपला बॅकफूटवर टाकले. या चारही जागांवर महायुतीचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक जिंकण्याचे आव्हान महायुतीपुढे असणार आहे. यात भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण भाजपच्या उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. त्या अटीवरच ते भाजपमध्ये गेले आहेत.

पण लोकसभा निवडणुकीत अनेक समीकरणे बदलली. अशोक चव्हाण सोबत असूनही लोकसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळविता आले नाही. भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांना या मतदारसंघात 84 हजार 331 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना तब्बल 83 हजार 490 मते मिळाली होती. म्हणजे चिखलीकर यांना केवळ 881 मतांचीच आघाडी मिळवता आली. त्यामुळे काँग्रेसकडून इथे तगडा उमेदवार देऊन चव्हाण यांना दुसऱ्यांदा धोबीपछाड देण्याची रणनीती आखली आहे. श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, सुभाष पाटील किन्हाळकर यांच्यासह चौदा कार्यकर्त्यांनी निवडणूक तयारी दर्शविली आहे. याशिवाय माधव पाटील किन्हाळकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पवारांकडे हा मतदारसंघ गेल्यास ते इथले उमेदवार असू शकतात.

आता यातील श्रीजया यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार? महाविकास आघाडी तगडा उमेदवार देत अशोक चव्हाण यांना खिंडीत गाठणार का? की भोकर आणि नांदेडवरील आपले वर्चस्व चव्हाण पुन्हा एकदा सिद्ध करणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us