Ground Zero : धीरज देशमुखांना रमेश कराड नडणार की पुन्हा पडणार?

  • Written By: Published:
Ground Zero : धीरज देशमुखांना रमेश कराड नडणार की पुन्हा पडणार?

2009, 2014 आणि 2019. लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसने तिन्हीवेळा मोठ्या फरकाने विजय मिळवला. यातील एका निवडणुकीतून दिवंगत काँग्रेस (Congress) नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा मुलगा धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांचा राजकीय प्रवेश झाला. आता धीरज देशमुख दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. तर यंदा लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे कट्टर समर्थक रमेश कराड हे पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहेत. यात आता देशमुख बाजी मारणार की कराड यांना तिसऱ्या प्रयत्नात यश येणार? काय होऊ शकते लातूर ग्रामीण मतदारसंघात? (Dheeraj Deshmukh of Congress will fight against Ramesh Karad of BJP in Latur Rural Assembly Constituency?)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरिजमधून…

लातूर ग्रामीण म्हणजे पूर्वीचा रेणापूर मतदारसंघ. 1980 मध्ये गोपीनाथ मुंडे हे पहिल्यांदा रेणापूर मतदारसंघातून निवडून आले होते. पण दुसऱ्या टर्मला म्हणजे 1985 मध्ये काँग्रेसच्या पंडितराव दौंड यांनी गोपीनाथ मुंडेंचा पराभव केला. पण 1990 मध्ये पुन्हा गोपीनाथ मुंडे येथून निवडून आले. त्यनंतर 2004 पर्यंत तेच या मतदारसंघाचे आमदार राहिले. ते मोठ्या मताधिक्य येथून निवडून येत होते. याच मतदारसंघातून निवडून आल्यानंतर 1995 ते 99 मध्ये उपमुख्यमंत्री राहिले. रेणापूर मतदारसंघ आणि गोपीनाथ मुंडे असे समीकरणच तयार झाले होते. मुंडे हे रेणापूर मतदारसंघाला आपली आईच म्हणत.

पण 2008 च्या पुर्नरचनेत रेणापूर मतदारसंघ गायब झाला. लातूर तालुक्यातील 96, संपूर्ण रेणापूर तालुका आणि औसा तालुक्यातील 46 गावांचा मिळून नवीन लातूर ग्रामीण हा मतदारसंघ तयार झाला. तर मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघ परळी झाला. त्यावेळी मुंडेनी एका जाहीर सभेत विलासरावांना साद घातली. हा मतदारसंघ आता मी तुमच्या ओटीत टाकतो आहे. मी या मतदारसंघावर आईचं प्रेम केलं आहे. आता माझ्या आईची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो, असे म्हणाले होते. पण यावरुनच हा मतदारसंघ अप्रत्यक्षपणे काँग्रेससाठी बाय दिल्याची चर्चा सुरु झाली होती.

अमित देशमुखांना देवघरातूनच आव्हान? अर्चना पाटील चाकूरकर टफ ठरणार?

नवीन रचनेनुसार लातूर ग्रामीण मतदारसंघातून वैजनाथराव शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी गोपीनाथ मुंडे खंदे समर्थक रमेश कराड हे भाजपकडून मैदानात उतरले होते. कराड यांना तब्बल 62 हजार 553 मते मिळाली होती. तर शिंदे यांनी 86 हजार 136 मते घेतली होती. त्यानंतर 2014 ची निवडणुकही चुरशीची झाली होती. अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे त्रिंबकराव भिसेही दहा हजार मताधिक्याने विजयी झाले. भिसे यांना एक लाख 897 मते मिळाली होती. तर रमेश कराड यांनाही 90 हजार 387 मते मिळाली होती.

2019 मध्ये काँग्रेसने धीरज देशमुख यांना मैदानात उतरवले. त्यामुळे विलासराव देशमुखांचा दुसऱ्या मुलगाही राजकारणात आला. त्यावेळी देशमुख यांच्याविरोधात रमेश कराड हे मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित होते. त्यांनी तयारीही केली होती. परंतु युतीत हा मतदारसंघ हा भाजप ऐवजी शिवसेनेच्या वाटेला गेला. शिवसेनेने सचिन उर्फ रवी देशमुख यांना उमेदवारी दिली. धीरज देशमुख यांनी पहिल्याच टर्ममध्ये सहज विजय मिळविला. त्यांना तब्बल 1 लाख 35 हजार 006 मते मिळाली होती. तर शिवसेनेचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. देशमुख यांना 13 हजार 524 मते मिळाली. त्यावेळी भाजपने शिवसेनेला काहीच मदत केली नसल्याचा आरोप झाला. भाजपने थेट नोटाला मतदान केल्याचे बोलले गेले. त्यावेळी कराड यांनी भाजप नेत्यांवर थेट हल्ला केला होता. त्यामुळे सर्वात आश्चर्यकारक मते मिळाली ती नोटाला. नोटाला दुसऱ्या क्रमांकाची तब्बल 27 हजार 500 मते मिळाली होती.

Ground Zero : बांगरांच्या आमदारकीवर नांगर फिरणार? ठाकरेंकडे चार तगडे पर्याय

लोकसभा निवडणुकीत विधानसभेचे अनेक गणिते अवलंबून होते. लोकसभेला भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांचा डॉ. शिवाजी कोळगे यांना जबदरस्त पराभव केला. श्रुंगारे हे दोन टर्म खासदार होते. त्यातू लातूर ग्रामीणमधून काळगे यांना 17 हजार 195 मतांचे मताधिक्य होते. गेल्या लोकसभेला श्रुंगारे यांना तब्बल 35 हजाराचे लीड मिळाले होते. लोकसभेसाठी विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड यांनी श्रृंगारे यांनी लातूरमधून जास्तीत जास्त लीड कसे मिळविला येईल, यासाठी प्रयत्न केले. पण धीरज देशमुख यांनी कराड यांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत.

आज घडीला या मतदारसंघावर विलासराव देशमुख यांचा मुलगा म्हणून धीरज देशमुख यांना वलय आहेच. पण त्याचबरोबर लातूर ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. देशमुखांच्या नेतृत्वाखाली असलेला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणा साखर व ट्वेंटीवन शुगर कारखाना या मतदारसंघात आहे. ऊस उत्पादक शेतकरी ही धीरज देशमुख यांची जमेची बाजू आहे. स्थानिक राजकारणावरही धीरज यांची चांगली पकड आहे.

यंदाच्या विधानसभेसाठी काँग्रेसकडून धीरज देशमुख हेच उमेदवार असतील. पण देशमुखांसमोर यंदा कडवे आव्हान असणार आहे. कारण यंदा रमेशअप्पा कराड पुन्हा विधानसभेची तयारी करत आहे. भाजपने त्यांनी उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात देशमुख विरुद्ध कराड अशी फाइट होऊ शकते. 2019 सारखे राजकीय समीकरण झाल्यास हा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेला जाऊ शकतो. सध्या तरी शिवसेनेकडे पक्का उमेदवार नाही. पण कराड यांना भाजपने उमेदवारी दिल्यास मात्र धीरज देशमुखांसमोर मोठे आव्हान असणार हे नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube