Download App

Ground Zero : पारनेरमध्ये ‘लंकेंना’ रोखण्यासाठी ‘विखेंच्या’ डोक्यात पाच नावे…

पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राणी लंके यांना भाजप किंवा राष्ट्रवादीमधून कोण लढत देणार?

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Politics: राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patik) या पिता-पुत्राच्या डोक्यात ‘निलेश लंके‘ (Nilesh Lanke) या एकाच नावाचा  प्रचंड राग आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अजितदादांची साथ सोडून, शरद पवारांकडे (Sharad Pawar) येऊन त्यांनी सुजय विखेंचा पराभव केला. केंद्रातील आणि राज्यातील सत्ता, पाण्यासारखा पैसा, प्रचंड ताकद अशा सगळ्या गोष्टी गाठीशी असतानाही लंकेंनी विखेंना आस्मान दाखवलं. आता याच लंकेंचे पारनेर जिंकून लोकसभेचे उट्टे काढायचे यासाठी विखे पाटील कामाला लागले आहेत. या रणनीतीमध्ये विखेंच्या डोक्यात सध्याला तरी पाच नावे असल्याची माहिती आहे. (Who will fight Rani Lanka of NCP Sharad Chandra Pawar party in Parner Assembly Constituency from BJP or NCP?)

लेट्सअप मराठीच्या ‘ग्राऊंड झिरो’ या आपल्या स्पेशल सिरीजमध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघातील चुरस…

पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजय औटी यांनी 2004, 2009 आणि 2014 असे सलग तीनवेळा निवडून येत हॅट्रिक मारली. पण 2019 मध्ये त्यांच्याच शिष्याकडून त्यांना पराभव पाहावा लागला. निलेश लंके राष्ट्रवादीचे आमदार झाले. तसे लंके हे औटींचेच कार्यकर्ते. औटी यांची छोटी-मोठी कामे करणे, त्यांच्यासोबत निवडणुकीचे व्यवस्थापन बघणे अशी कामे लंके करत. पण दोघांमध्येही काही कारणाने वादाची ठिणगी पडली. तिथून अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यासारख्या जिगरबाज खेळाडूला हेरले.

या पहिलवानाने औटी यांचा मोठा मताधिक्क्याने पराभव केला. त्यानंतर हा मतदारसंघात लंकेच हे किंग ठरले. तालुक्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती लंकेंनी ताब्यात घेतली. नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवला, सुपा एमआयडीसीमध्ये लक्ष घातले. थोडक्यात लंकेंनी निवडून येताच पारनेरमध्ये सबकुछ निलेश लंके असे वातावरण तयार केले. कोरोना काळात त्यांनी उभारलेल्या कोव्हिड सेंटरमुळे ते संपूर्ण राज्यात पोहचले. तिथपासून लंके यांनी जिल्ह्याच्या राजकारणाकडे मोर्चा वळवला.

Ground Zero : अनिल देशमुखांचे राजकारण संपवण्याचा डाव… मुलानेच उचलला विडा?

लोकसभा मतदारसंघातील इतरही भागात दौरे सुरु केले. लग्न, हॉटेलचे उद्घाटन असो की सुख-दुःखाचे कार्यक्रम असो. लंके हजर राहू लागले. जनसंपर्क वाढवू लागले, कार्यकर्त्यांना जोडून घेण्याचा कार्यक्रमच त्यांनी हाती घेतला. शरद पवार यांच्याकडूनही त्यांना लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल मिळाला. पण मध्येच राष्ट्रवादीत बंड झाले. लंके अजितदादांसोबत महायुतीत आले. मात्र त्यांना लोकसभा खुणावत होती. विखे पाटलांच्या दहशतीचे झाकण उडवायचेच हे लक्ष्य लंकेंच्या डोळ्यासमोर होते.

त्यातून लोकसभेपूर्वी लंके यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देत अजित पवार यांना सोडचिठ्ठी दिली. लोकसभेला तुतारी हाती घेत सुजय विखे यांच्याविरोधात शड्डू ठोकला. त्यांना पराभवाचा धक्का देत थेट दिल्ली गाठली. आता पारनेरमधून विधानसभा कोण लढवणार याची चर्चा सुरु आहे.  पारनेरमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या दोन आघाड्यांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमधील पक्षांनी आपली दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे. मात्र खरी लढत ही निलेश लंके विरुद्ध पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे यांच्यात लढाई असणार आहे.

थोरातांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी सुजय विखेंनी बाह्या सरसावल्या…

तसे पाहिल्यास ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाचा उमेदवार हे सूत्र दोन्ही आघाड्यांमध्ये आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे.  लंके यांचा या मतदारसंघात प्रभाव पाहता हा मतदारसंघ शरद पवार यांचाही तसाच प्रयत्न असणार आहे. निलेश लंके यांच्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या पत्नी राणी लंके या तयारीला लागल्यात. त्या मतदारसंघात दररोज कुठेना कुठे हजर असतात. पती निलेश लंके यांच्या प्रमाणे ते कार्यकर्त्यांचा एकही कार्यक्रम सोडत नाहीत.  पण ठाकरे गटाचाही या मतदारसंघावर नजर आहे. ठाकरे गटाकडून तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, नगर पंचायत समितीचे माजी सभापती संदेश कार्ले यांची नावे चर्चेत आहेत.

लंके यांच्याविरोधात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या डोक्यात प्रमुख पाच नावे आहेत. यात भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील, माजी सभापती काशीनाथ दाते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुक्याध्यक्ष राहुल शिंदे आणि युवा नेते विजय सदाशिव औटी यांची नावे चर्चेत आहेत. या मतदारसंघात विखेंना मताधिक्य मिळालेले नसले तरी या मतदारसंघात विखे यांचे कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. अजित पवार यांच्या गटाकडून देखील ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.

आता या लढाईत नेमके कोण बाजी मारणार, लंके पुन्हा पारनेरवरचा आपला प्रभाव दाखवून देणार का? की विखे पाटील लोकसभेचे उट्टे काढून लंकेंच्या विजयीरथाला ब्रेक लावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us