फेसबुक लाइव्हमध्ये जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

जातिवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकर हिच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1979 अंतर्गत गुन्हा दाखल.

  • Written By: Published:
Untitled Design (221)

Atrocity case registered against Rupali Raskar for making casteist remarks : सोशल मीडियावरील फेसबुक लाइव्ह व्हिडीओमध्ये अनुचिसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अत्यंत अपमानास्पद व जातिवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रूपाली रासकर हिच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1979 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या सारीका संदीप गांगुर्डे (रा. बोल्हेगाव ता. अहिल्यानगर) यांनी याबाबत कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास फेसबुकवर ‘रूपाली रासकर’ या नावाच्या खात्यावरून प्रसारित करण्यात आलेला सुमारे 43 मिनिटांचा फेसबुक लाइव्ह व्हिडीओ पाहताना अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अपमानास्पद, जातिवाचक भाषा वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले.

संबंधित व्हिडीओमध्ये 17 ते 17.10 मिनिटांच्या दरम्यान ही आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. फिर्यादी सारीका गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर वक्तव्यांमुळे संपूर्ण समाजाची बदनामी झाली असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सामाजिक सलोखा बिघडवणारी ही कृती असून यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का; प्रचारगीतातील ‘भगवा’ शब्दावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(1) व संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे सोशल मीडियावरील बिनधास्त, असंयमित व द्वेषपूर्ण भाषेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजघटकांविरोधात अपमानास्पद वक्तव्ये करण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक स्तरावरून होत आहे.

रूपाली रासकर कोण आहे?
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रूपाली रासकर हिच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 40 हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. वेगवेगळ्या पुरुषांशी विवाह करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, संपत्ती बळकावणे तसेच राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे आरोप तिच्यावर यापूर्वीही झाले आहेत.

follow us