पृथ्वीराज चव्हाण. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि आताचे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते. कराड तालुका हा चव्हाणांचा बालेकिल्ला. पूर्वीच्या कराड लोकसभा मतदारसंघाची खासदारकीही तब्बल 37 वर्षे चव्हाण यांच्याच घरात होती. 1957 ते 1998 या काळात पृथ्वीराज यांचे वडील आनंदराव चव्हाण चारवेळा, आई प्रेमलाकाकी चारवेळा खासदार होत्या. पुढे त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षही झाल्या. स्वत: पृथ्वीराज चव्हाण तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले. नाही म्हणायला 1999 साली श्रीनिवास पाटील यांनी चव्हाणांचा पराभव केला. (Will there be a fight between Prithviraj Chavan of Congress and Atul Bhosle of BJP from Karad South Assembly Constituency?)
पण त्यानंतरही काँग्रेसने चव्हाणांना ताकद दिली. ते राज्यसभेवर खासदार झाले, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. 2014 आणि 2019 मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. राज्यात काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ आणि ताकद बाळगून असलेले नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे आताच्या काळात चव्हाण यांचा कराडमधून पराभव होऊ शकतो, असे म्हणण्याचे धाडस कोण करणार नाही. पण हेच चव्हाण आताच्या विधानसभा निवडणुकीत डेंजर झोनमध्ये आहेत, ते पराभवाच्या छायेत आहेत असे म्हणणे अतिश्योक्ति ठरणार नाही, अशीच सध्याची कराड मतदारसंघाची परिस्थिती आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. 1962 पासून इथे एकदाही काँग्रेसचा पराभव झाला नाही. दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासकाका उंडाळकर हे दोघे इथले यापूर्वीचे आमदार. विलास काका तब्बल 35 वर्षे इथले आमदार राहिले. 2014 च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण सुरक्षित जागेच्या शोधात होते. त्यावेळी काँग्रेसने विलास काकांचे तिकीट कापले अन् चव्हाण यांना दिले. विरोधात विलास काकांनी बंडखोरी केली. अतुल भोसलेही भाजपमध्ये गेले आणि मैदानात उतरले. मोदी लाट असल्याने काहीही होऊ शकणार होते. वातावरणही तसेच होते. पण चव्हाण 16 हजार मतांनी निवडून आले.
चव्हाण निवडून आले तरी 2009 च्या विधानसभेत नऊ हजार मतांवर असलेला भाजप पक्ष 2014 मध्ये थेट 58 हजारांवर गेला. चव्हाणांसाठी ही धोक्याची घंटा होती. 2019 मध्ये चव्हाणांना आणखी अलर्ट मिळाला. विजयासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. अतुल भोसले यांनी कडवी लढत दिली. त्यामुळे एकत्र मतदान होऊनही जिथे लोकसभेला श्रीनिवास पाटील यांना 31 हजारांचे लीड होते तिथेच चव्हाणांना अवघ्या नऊ हजारांचे लीड मिळाले होते. तेव्हाच बोलले गेले की अतुल भोसले यांनी आणखी थोडा जोर लावला तर ते कराड दक्षिण जिंकू शकतात.
मग फडणवीस सरकारच्या सत्तेचा उपोयग करत अतुल भोसले यांनीही मतदारसंघांत विकास कामांचा आणि समाज कार्याचा धडाका सुरू ठेवला. 2016 मध्ये भोसलेंनी कराडची नगरपालिका ताब्यात घेतली. भाजपची वाढती ताकद पाहून विरोधातील उंडाळकर गटही सावध झाला. जुने मतभेद विसरुन उदयसिंह उंडाळकरांनी चव्हाणांशी जुळवून घेतले. सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणानंतर आमदार चव्हाण आणि उंडाळकर गटाने बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढवली, सत्ता ताब्यात ठेवली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काय होणार याच्या चर्चा कराडमध्ये झडू लागल्या.
2024 च्या लोकसभा निवडणुकीला विधानसभेची सेमी फायनल म्हणून पाहिली जाऊ लागली. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकानेच प्रतिष्ठा पणाला लावत काम केले. कराड दक्षिण मतदारसंघही त्याला अपवाद नव्हता. अतुल भोसले यांनीही इथे अथक परिश्रम घेतले. अखेरीस काँग्रेस विचारांच्या, यशवंतरावांच्या विचारांच्या या मतदारसंघात भाजप उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले लीडवर आले. हे लीड भले 616 मतांचे असेल पण जिथे भाजपला उभं राहायलाही जागा नव्हती तिथे अतुल भोसले यांच्या रुपाने भाजप उभी राहिली आणि लीडमध्येही आली.
कराड दक्षिणेत घेतलेल्या या मतांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयाला हातभार लावलाच. पण उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मार्गावर त्यांच्या यशाची बिजे रोवली आहेत. अतुल भोसले यांनीही आता विधानसभा जिंकायचीच असा चंग बांधला आहे. त्यासाठी तयारीही सुरु आहे. चव्हाण यांचे जवळचे सहकारी राजेंद्र यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये घेत ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. राजेंद्र यादव यांचा मलकापूर आणि आजूबाजूच्या परिसरात चांगला प्रभाव आहे. त्याचा फायदा भोसले यांना विधानसभा निवडणुकीसाठीही होईल असे दिसते. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. ते डेंजर झोनमध्ये आहेत हे नक्की.
जाता जाता एका सर्व्हेबद्दल माहिती देतो. ‘न्यूज एरिना इंडिया’ या राजकीय संस्थेने गतवर्षी एक सर्व्हे केला होता. यात कराड दक्षिणमधून चव्हाण पराभूत होऊ शकतात असा अंदाज वर्तवला होता. लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर हा अंदाज सत्यात उतरण्याची भीती आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांना थांबवून काँग्रेसने माजी आमदार विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह उंडाळकर यांना तिकीट दिल्यास आश्चर्य वाटायला नको.