जळगाव ग्रामीण : शिंदेंचे ‘गुलाब’राव कोमेजणार? ठाकरे-पवारांचे ‘गुलाब’राव फुलण्याच्या तयारीत
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सध्या तीन गुलाबरावांची जोरदार चर्चा आहे. यात पहिले गुलाबराव (Gulabrao Patil) आहेत ते शिवसेनेचा (Shivsena) ढाण्या वाघ. दुसरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावंत शिलेदार गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) आणि तिसरे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ. याच तीन गुलाबरावांमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत लढत होणार आहे. यातही गुलाबराव पाटील यांचे तिकीट फिक्स मानले जाते. पण त्यांच्याविरोधात ठाकरे की पवारांच्या गुलबरावांचे काटे टोचू शकतात? यात कोण जिंकू शकत आणि मतदारसंघाची सद्यस्थिती काय आहे? (Gulabrao Patil vs. Gulabrao Devkar or Gulabrao Wagh may be the candidates in Jalgaon Rural Constituency in the upcoming assembly elections.)
पाहुया लेट्सअप मराठीच्या ‘ग्राऊंड झिरो’ या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व राखण्यात ज्या नेत्यांचे योगदान आहे त्यांपैकी एक म्हणजे गुलाबराव पाटील. पान टपरीवाल्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास कट्टर शिवसैनिक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार असा राहिला आहे. ग्रामीण भाषेत, शेतकऱ्यांना, सामान्य माणासाला कळेल अशा शब्दात आक्रमक भाषण करण्याची कला गुलाबरावांना अवगत आहे. त्यामुळे खान्देशात आणि शिवसेनेत मुलुख मैदानी तोफ म्हणूनही संबोधले जाते. हेच गुलाबराव पाटील सध्या जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत. 2009 च्या विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या या मतदारसंघातून ते दुसऱ्यांना निवडून आले आहेत. त्यापूर्वी 1999 आणि 2004 मध्ये ते एरंडोल मतदारसंघातून आमदार झाले होते.
गुलाबराव पाटील यांनी 2009 चा अपवाद वगळता पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे हा पराभव ते आजही विसरलेले नाहीत. राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांच्याकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यात देवकर यांना 71 हजार 556 तर पाटील यांना 66 हजार 994 मते मिळाली होती. पाटील यांच्या त्या पराभवाला तीन गोष्टी कारणीभूत मानल्या गेल्या. पहिले म्हणजे मतदारसंघ नवीन असणे. दुसरे पाटील आणि भाजपचे तत्कालीन दिग्गज नेते एकनाथ खडसे यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर. याच वैरातून खडसे समर्थक पी. सी. पाटील यांनी उघडपणे गुलाबराव देवकर यांना रसद पुरवली होती. तिसरे कारण होते मनसेचे उमेदवार ललित कोल्हे. कोल्हे यांनी त्या निवडणुकीत जवळपास चौदा हजार मते घेतली होती. ही मते शिवसेनेचीच विभागली गेल्याचे दिसून आले होते.
Ground Zero : शरद पवारांचा डोळा फडणवीसांच्या मोहऱ्यावर… मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंचे नाव?
2014 मध्येही खडसे समर्थक पी.सी. पाटील यांनी भाजपकडून दोन्ही गुलाबरावांविरोधात चांगली झुंज दिली होती. पण पाटील पुरून उरले. त्यांनी तब्बल 31 हजारांच्या मताधिक्याने गुलाबराव देवकर यांचा पराभव केला. 29 कोटींच्या घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकर दोषी सापडल्याने 2019 ची निवडणूकही पाटील यांनी अगदी सहजपणे जिंकली. नाही म्हणायला भाजपच्या चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी करत त्यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. पण बंड मोडून काढत पाटील यांनी 47 हजार मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला. त्यानंतर ते मंत्रीही झाले.
आता गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ते पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी करत आहेत. मतदारसंघ पिंजून काढत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार पाटील यांना देवकर यांनी तना-मनाने साथ दिली होती. त्यांच्यासाठी कोपरा बैठका घेण्यापासून त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी रणनीती बनविण्यापर्यंत मदत केली होती. या बदल्यात देवकर यांना विधानसेभच्या उमेदवारीची आणि मदतीची अपेक्षा आहे. पण त्यांच्या वाटेत तिसऱ्या गुलाबरावांचे काटे आहेत.
Ground Zero : बबनरावांची माघार, मुलगा मैदानात… श्रीगोंद्यात विरोधकांना सुगीचे दिवस?
ज्याचा आमदार त्याची जागा या ठरलेल्या सूत्राप्रमाणे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने पक्षाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे तयारी करत आहेत. याशिवाय उद्योजक सुरेश चौधरी हे इच्छुक आहेत. एका बाजूला महाविकस आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असताना शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र, गत निवडणुकांतील अनुभव पाहता भाजपची आमदार पाटील यांना कितपत साथ मिळेल, यावरच त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा..