Nitin Desai’s suicide : पुणे : नितीन देसाई हे माझे अत्यंत चांगले मित्र आणि स्नेही होते. त्यांनी मध्यंतरी राज्य सहकारी बँकेकडे 300 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. त्यानिमित्ताने मी त्यांच्या कर्जत येथील स्डुडिओलाही भेट दिली होती. मात्र फिजीबिलीटी नसल्यामुळे मी त्यांना आर्थिक मदत करु शकलो नव्हतो, असं म्हणतं राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबतच्या आठवणी जागविल्या. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. तसेच संपूर्ण बँकिंग क्षेत्रालाही कर्जाच्या वसुलीबाबत महत्वाचा सल्ला दिला. (After Nitin Desai’s suicide, State Co-operative Bank administrator’s important advice to the banking sector)
नितीन देसाई यांची आत्महत्या ही संपूर्ण बँकिंग क्षेत्राला अत्यंत चिंतीत करणारी आणि चिंतन करायला लावणारी घटना आहे. कारण जेव्हा एखादा व्यक्ती कर्ज मागतो आणि बँक त्याला कर्ज मंजूर करते, त्यावेळी त्या कर्जातील व्यवहारिकता तपासणं खूप महत्त्वाचं असतं. आजकाल मात्र ही व्यवहारिकता तपासली जात नाही. अलिकडील काळात सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज दिले जातात. म्हणजे मालमत्ता आहे, त्याची वसुली करता त्याची किंमत आहे. त्यामुळे कर्ज देऊन टाका, असे सांगितले जाते.
पण त्या कर्जाचा नेमका विनियोग कसा होतो? त्यातून त्याचे उत्पन्न किती प्राप्त होते, त्या उत्पन्नाचा फंड फ्लो किती प्राप्त होतो, त्यानुसार कर्जदाराला हप्ता भरण्यासाठी किती मुदत पाहिजे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार या नॉन बँकिंग कंपन्या करत नाहीत. त्यामुळे अशा वेळेला ही लोक अडचणीत येतात तेव्हा ते आर्थिक विवंचनेत जातात, मानसिक त्रास, प्रेशर येऊ लागतं. त्यावेळी या कंपन्यांकडून ताबडतोब एक अंतिम पाऊल उचललं जात ते म्हणजे जप्तीचं. पठाणी पद्धतीची वसुली सुरु होते. मालमत्ता जप्त करा, तिचं मुल्यांकन करा, ती बाजारात विका आणि वसुली करा. पण नितीन देसाई सारखा हळव्या मनाचा एक मनस्वी कलाकार अशा प्रसंगांना तोंड देऊ शकत नाही.
पण वास्तविक या कर्जाची वसुली उत्पन्नातूनच झाली पाहिजे हे बँकांच काम आहे. या करिता कर्जदाराला उत्पनक्षम बनवायचं काम या बँकांचा आहे. या अशा प्रकारच्या अडचणीत असलेल्या कर्जांना आजारी उद्योग म्हणून घोषित केले पाहिजे. त्यांचं रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे, त्यांचं नर्सिंग केलं पाहिजे, अशा प्रकारे कर्जाची वसुली त्याच्या उत्पन्नातून झाले पाहिजे. हे पठाणी मार्ग हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. पण आजकाल हा पहिला पर्याय म्हणून वापरला जातो, त्यामुळे हे अत्यंत घातक आहे.
आज नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यासारखे उद्योगपती कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात सन्मानाने फिरत आहेत. मात्र त्याच बॅकग्राऊंडवर नितीन देसाईंसारखा अत्यंत हळव्या मनाचा माणूस आत्महत्या करतो ही अत्यंत दुःखाची गोष्ट. त्यामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्राला यावर विचार करण्याची गरज आहे, अशीही भावना विद्याधर अनास्कर यांनी बोलून दाखविली.