पुणे : घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (Ashok Dhumal) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कात्रज परिसरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गत सोमवारी (15 जानेवारी) ही घटना घडली आहे. मात्र पोलिसांकडून (Police) या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. (Assistant Commissioner of Police Ashok Dhumal seriously injured after fell from the balcony)
एका बाजूला धुमाळ पाय घसरुन पडल्याचे सांगण्यात येत असतानाच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तीन महिन्यांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात टोळीयुद्धात एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणाचा तपास झोन एकच्या म्हणजेच फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्याकडे देण्यात आला होता.
मात्र या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्यामुळे आरोपी आणि साथीदारांना जामीन मंजूर करण्यात आला होता. निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात अपयश आल्याने आरोपींची सुटका झाल्याने पोलीस दलावर न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. कायदेशीर प्रक्रियेतील या त्रुटीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धुमाळ यांना झापले होते. यानंतर ते नैराश्येत गेले होते.
अशात सोमवारी ते बाल्कनीतून पडून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, दोन डीसीपी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे पोलिस दलात धुमाळ यांनी नैराश्येतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या अफवांना पूर्णविराम दिला. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने ते जखमी झाल्याचे स्पष्टीकरण या अधिकाऱ्यांनी दिले.