Baburao Chandere : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांनी जागेच्या वादातून दोन जणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर विरोधकांकडून बाबुराव चांदेरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. तर आता बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाबुराव चांदेरे यांनी जागेच्या वादातून विजय रौंदळ आणि प्रशांत जाधव यांना मारहाण केली. ज्यात विजय रौंदळ डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात प्रशांत जाधव यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. तर चांदेरे यांनी प्राण घातक हल्ला करूनही पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रशांत जाधव यांनी केला आहे.
माहितीनुसार, जुलै 2023 मध्ये वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ स्वतः उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पाहिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना असे प्रकार राष्ट्रवादी पक्षात खपवून घेतले जाणार नाही. जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कुणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कोण आहे बाबुराव चांदेरे ?
बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आहे. ते बावधन, पाषाण भागात राष्ट्रवादीचे काम पाहतात. बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या ते राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक आहेत.