सातारा : अखेर सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale ) यांचे नाव अंतिम झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. सातारा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आग्रही होता. मात्र एका लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात एक राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपकडून (BJP) अजित पवार यांना देण्यात आले आहे. त्याबाबत स्वतः अजित पवार यांनीच काल (27 मार्च) पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संकेत दिले आहेत.
पुण्यात अजित पवार यांच्याबरोबरच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी सातारा मतदारसंघ भाजपला सोडू नका आणि माढा मतदारसंघातील उमेदवार बदला, अशी टोकाची भूमिका घेतली. त्याचबरोबर साताऱ्यातून नितीन पाटील आणि माढ्यातून संजीवराजेंच्या उमेदवारीची एकमुखीही मागणी करण्यात आली आहे. मात्र, माढ्याची उमेदवारी फायनल असून आपल्याला राज्यसभा दिली जाणार आहे, असे आश्वासन अजित पवार यांनी उपस्थितांना दिले. (battle for Satara Lok Sabha constituency is over and the name of Chhatrapati Udayanraje Bhosale has been finalized from BJP.)
मागील आठवडाभरापासून दिल्ली मुक्कामी असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच ग्रीन सिग्नल दिला आहे. काल त्यांचे सातारला आगमन झाले असून त्यांच्या समर्थकांकडून जिल्हा प्रवेश सीमेवर शिरवळ- निरा नदीजवळ जल्लोषी स्वागत करण्यात आले. हा स्वागतसोहळा दणक्यात करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी रात्रंदिवस राबत होते. माझ्या उमेदवारीवर शंका नको, पक्षश्रेष्ठींनी मला जे सांगायचे ते सांगितले आहे, असे सूचक विधान उदयनराजे यांनी केले.
दरम्यान, सातारा भाजपला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादीने नाशिक मतदारसंघांवरही दावा केला असल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ऐनवेळी छगन भुजबळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, अशी चर्चा महायुतीच्या गोटात आहे.