पुणे : ऐन दहीहंडीच्या दिवशीच पुणे भाजपमध्ये (BJP) वादाचा थर चढला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज (27 ऑगस्ट) रोजी शहरातील तब्बल 26 दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार आहेत. मात्र पाटील यांच्या कोथरुडमधील उमेदवारीला आव्हान देणाऱ्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांच्या दहीहंडी सोहळ्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. (Minister Chandrakant Patil has avoided attending the Dahihandi function of former corporator Amol Balwadkar.)
विशेष म्हणजे बालेवाडीतील या दहीहंडी उत्सवाला भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळेही उपस्थित राहणार आहे. यात त्याचा सत्कार करण्यात येणार असून बालेवाडीतील ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारलेला तब्बल पाच लाखांच्या निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
अमोल बालवडकर यांनी कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यांची ही इच्छा म्हणजे थेट चंद्रकांत पाटील यांनाच आव्हान मानले जाते. कारण बालवडकर यांची इच्छा पूर्ण करायची असल्यास कोथरुडचे विद्यमान आमदार असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा पत्ता भाजपला कट करावा लागेल. बालवडकर यांनी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष असताना या भागात अनेक कामे केलेली आहे. त्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क तयार केला आहे. सध्या ते ‘अमोल बालवकर फाउंडेशन’ माध्यमातून जनसंपर्कात आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून ते मोठे कार्यक्रम घेत आहेत.
याच फाऊंडेशनच्या माध्यमातून बालेवाडीमध्ये त्यांनी स्वप्निल कुसळेच्या सत्काराचे आणि दहीहंडीचे आयोजन केले आहे. चंद्रकांत पाटील आज पुण्यात त्यातही कोथरूड मतदार संघात होणाऱ्या जवळपास सर्वच दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणार आहेत. मात्र बालेवाडीमधील बालवडकर यांच्या दहीहंडी उत्सवाला मंत्री पाटील जाणार नाहीत. या कार्यक्रमाचा उल्लेखच त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये नमूद केलेला नाही. पाटील यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नव्हते का? असे विचारला असता अमोल बालवडकर म्हणाले, “आपण नम्रपणे मंत्री पाटील यांना निमंत्रण दिले होते. स्वप्निल कुसळे यांच्या सत्कार कार्यक्रमाचीही पूर्ण कल्पना दिली होती”.
चंद्रकांत पाटील हे आपल्या कार्यक्रमस्थळापासूनही काही अंतरावर एका दहीहंडी उत्सवाला येणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अनावधानाने कार्यक्रमपत्रिकेत आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सांगणे राहून गेले असेल त्यांना पुन्हा विनंती करणार आहे, असेही बालवकडर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणे टाळत आपली उमेदवारी रद्द करण्याच्या मागे लागलेल्या बालवडकर यांना चंद्रकांतदादांनी आपली नाराजी थेट पणे दाखवून दिली आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद आगामी काळात कसा रंगणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.