लेट्सअप विशेष- विष्णू सानप
Pune LokSabha ByElection : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं निधन झालं होतं. बापटांच्या निधनानंतर पुण्याच्या पोटनिवडणुकीची मोठी चर्चा सुरु झाली आहे. अनेकांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत तर काहींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण यामध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल याची मोठी उत्सुकता मतदारांमध्ये दिसून येतीय. नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष भाजप चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट (Gaurav Bapat) यांची भेट घेतलीय. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या संभाव्य उमेदवाराची चर्चा सुरु झाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गिरीष बापट यांचे पुत्र गौरव बापट यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन आवर्जून भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर पुन्हा एकदा पुण्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू झाली.
दरम्यान, सोमवारी चंद्रशेखर बावनकुळे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे बैठक घेतली. त्यानंतर गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जाऊन गौरव बापट यांची भेट घेतली आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजप तथा सर्वपक्षीय नेते मंडळी बापट कुटुंबीयांना भेटून गेले. मात्र, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी बापट यांच्या निवासस्थानी पुन्हा भेट दिल्याने पोटनिवडणुकीसंदर्भात काही खलबत झाली नसतील ना अशीही चर्चा रंगत आहे.
सत्तासंघर्षावरील निर्णयाआधी नार्वेकरांचे मोठे विधान; म्हणाले 16 आमदारांचा निर्णय फक्त…
बापट यांचं निधन होऊन काहीच दिवस होत नाही तोच भाजप शहराध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांकडून भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून आणि त्यातही राष्ट्रवादीला पुणे लोकसभेतून संसदेत खासदार पाठवण्याची घाई झाली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीपक मानकर यांनी दावाही ठोकला आहे.
दुसरीकडे पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसची आहे. मात्र, काँग्रेस लढवणार असं जरी म्हणत असले तरी निवडणुकीसाठी बॅनरबाजी किंवा दावा सध्यातरी शून्य आहे. यामुळे ही जागा राष्ट्रवादीला तर देऊ केली नाही ना? असाही अनेकांना प्रश्न पडला आहे.
.. तर मग सर्वांवरच कारवाई करणार का ? काँग्रेस-भाजप युतीवर वडेट्टीवारांचा सवाल
दरम्यान, पोटनिवडणुकीत खासदारकीसाठी भाजपमध्ये मोठी स्पर्धा आहे. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचे नावं चर्चेत आहेत. त्यामुळे बापट कुटुंबीयांच्या मनात काय आहे? याची चाचपणी करण्यासाठी तर बावनकुळेंने भेट घेतली नाही ना अशाही चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
नुकतीच कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार मताधिक्याने भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा धुवा उडवला होता. यामुळे भाजपची राज्यस्तरावर नाचक्की झाली होती. त्यामुळे भाजप लोकसभा पोटनिवडणुकीत विचार करूनच पावलं टाकेल, अस अनेक राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
एमपीनंतर आता ‘द केरला स्टोरी’ या राज्यात करमुक्त, खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
आधीच कसब्यात टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज आहे. त्यात तोच कसब्याचा पॅटर्न वापरून टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपसाठी अवघड आहे. त्यामुळे गौरव बापट हे जरी राजकारणात सक्रीय नसले तरी त्यांच्या पत्नी स्वरादा बापट यांच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये एकमत होऊ शकतं, असंही मत भाजपचे नेते खाजगीमध्ये सांगतात. त्यामुळे बावनकुळेंनी घेतलेल्या भेटीचा अर्थ पोटनिवडणुकीशी संबंधित काढला जात आहे. आता पोटनिवडणूक कधी लागणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार याचे उत्तर काही दिवसात स्पष्ट होईल.