पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून हटविण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. बारामती लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भोर, पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी भोर विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी अवघे 15 पदाधिकारी उपस्थित होते. (Chandrashekhar Bawankule has warned that workers who do not listen to Prime Minister Narendra Modi’s ‘Mann Ki Baat’ program will be removed from their posts)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून हटविण्यात येईल. कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेच पाहिजे आणि त्या संदर्भातील छायाचित्रे समाजमाध्यमांत दिसली पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्येय-धोरणे पदाधिकाऱ्यांमार्फत, कार्यकर्ते, नागरिकांमार्फत पोहचली जावी, यासाठी हा इशारा त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांना उद्देशून “मन की बात” कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 मध्ये प्रसारित करण्यात आला होता. देशभरातील नागरिक मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम ऐकत असतात.देशामध्ये घडणाऱ्या अनेक घटना तसेच विविध नागरिक अथवा विविध समूह यांनी केलेले विशेष कार्य या कार्यक्रमाद्वारे मोदी देशवासियांपर्यंत नेत असतात.
यंदा 440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती लोकसभा शंभर टक्के जिंकणार आहे. 51 टक्के मते घेऊन जिंकू असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते महाविजय 2024 अभियानाअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमध्ये बोलत होते. महायुतीमध्ये बारामती लोकसभेतून आम्ही नक्की विजयी होऊ. या महाविजयाचा संकल्प करण्याकरिता आजची बैठक होती. या बैठकीमध्ये सहाशे कमांडर कार्यकर्ते हे बारामती लोकसभेसाठी नियुक्त केले आहे. हे कार्यकर्ते साडेतीन लाख घरी जाऊन सरकारच्या योजनांची माहिती देणार आहे. संपर्क ते समर्थन अभियान राबविणार आहे. 51 टक्के मते घेऊन बारामती लोकसभा आम्ही जिंकणार आहोत.