Download App

“क्रांतीवीर चापेकर स्मारक विद्यार्थ्यांना दाखवा, त्यासाठी व्यवस्था करा”; CM फडणवीसांच्या सूचना

Devendra Fadnavis : क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी स्मारकारच्या कामाचे कौतुक केले. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला एक टास्कही दिला. स्मारकाला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता होणार नाही. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे स्मारक आपण उभे करुया. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना या स्मारकात येता येईल अशी व्यवस्था दोन्ही महानगरपालिकांनी करावी. त्यांची नेण्याआणण्याची व्यवस्था करावी. कारण विद्यार्थ्यांनी स्मारक पाहिलं तरच त्यांच्यावर संस्कार होणार आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले, स्मारकाच्या भूमिपूजनला हजर होतो आता लोकार्पण सोहळ्यालाही हजर राहता आलं याचा आनंद वाटतो. चांगलं स्मारक तयार झालं असून यात तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात आला आहे. चापेकर बंधूंच्या जीवनातले चौदा प्रसंग याठिकाणी पहायला मिळतात. ज्यावेळी पुण्यात प्लेगची साथ आली त्यावेळी इंग्रजांनी एक जुलमी कायदा तयार केला होता. या कायद्याने पोलिसांना अमर्यादीत अधिकार देण्यात आले. प्लेग आजाराने लोकांचा मृत्यू होत असतानाही इंग्रज त्यांच्यावर आघात करत होते. अनिर्बंध व्यवस्था झाल्याने लोकांचा संताप वाढत चालला होता. अन्याय अत्याचार सुरुच होते. पण अशा प्रकारचा अधिकार मिळाल्याने अधिक प्रमाणात अन्याय अत्याचार इंग्रजांच्या सत्तेकडून होत होते.

लोकांच्या मनात चीड होती. कुठेतरी हे थांबलं पाहिजे अशी भावना होती. हीच भावना लोकमान्य टिळकांनी देखील व्यक्त केली होती. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अशी व्यक्तिमत्वं आहेत ज्यांनी हजारो क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. चापेकर बंधुंच्याही मनात होतं की अन्याय सहन करायचा नाही. त्यानंतर इंग्रज अधिकारी रँड याचा वध त्यांनी केला.

चापेकर बंधू पकडले गेले नसते. पण आपल्याकडे फितुरांचा इतिहास आहे. फितुरी झाली आणि त्यात ते पकडले गेले. पकडले गेल्यानंतरही त्यांनी कोणताच पश्चात्ताप व्यक्त केला नाही. त्यांनी शरणागती स्वीकारली नाही. अगदी शेवटपर्यंत त्यांचा लढा सुरू होता, असे फडणवीस यांनी सांगितले.

..म्हणून मी पीएम मोदींचे आभार मानतो

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या साडेबारा हजार क्रांतीकारकांच्या कथा आणि गाथा शोधून काढल्या आणि आपल्यापर्यंत पोहोचवल्या. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य काही मोफत मिळालेलं नाही. स्वातंत्र्यासाठी किती जणांनी बलिदान दिलंय याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

भारताचा इतिहास राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. स्मारकाला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता होणार नाही. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे स्मारक आपण उभे करुया. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना या स्मारकात येता येईल अशी व्यवस्था दोन्ही महानगरपालिकांनी करावी. त्यांची नेण्याआणण्याची व्यवस्था करावी. कारण विद्यार्थ्यांनी स्मारक पाहिलं तरच त्यांच्यावर संस्कार होणार आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधानसभा निवडणूक प्रकरण, मुंबई उच्च न्यायालयाने बजावली CM फडणवीसांना नोटीस

follow us