बारामती : पुण्यासह शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसची मोठी ताकद आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हा-मुळशी आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे बारामतीतून काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे बारामती आणि शिरुरचे पक्षाचे निरीक्षक कुणाल पाटील यांनी सांगितले. ते लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीत बोलत होते. (Congress claims Baramati Lok Sabha constituency which is a stronghold of NCP)
काँग्रेसकडून 48 लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघातील काँग्रेसची ताकद, कार्यकर्त्यांची भावना, मतदारसंघातील स्थानिक पाातळीवरील राजकारण, मित्र पक्षांची ताकद आणि उमेदवाराची चाचपणी अशी सर्व गोष्टींचा आढावा घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. यात शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यानंतर त्यांनी थेट बारामती लोकसभा मतदारसंघावरच दावा ठोकला आहे.
पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळे या दोन्ही मतदासंघातून स्वबळावर लढावे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. पण याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.
बारामती लोकसभा मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. तर 1999 पासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. तर दुसरीकडे शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे खासदार आहेत. आता काँग्रेसने या दोन्ही मतदारसंघातून दावा ठोकल्यामुळे शरद पवार यांची मुलगी असलेल्या सुप्रिया सुळेंची खासदारकी धोक्यात आली का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र याचे उत्तर आता आगामी लोकसभा निवडणुकीतच मिळणार आहे.