Download App

Pune : “ए घायवळ… ए मारणे… तुला समजलं का?” : नवीन आयुक्तांचा पुण्यातील गुंडांना जाहीर दम!

पुणे : “कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. ए घायवळ, ए मारणे… सांगितलेल्या सूचना समजल्या का? अशा दमदाटीच्या भाषेतच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचिन गुंडांना दम भरला.

नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी पदभार स्वीकारताच पहिला दणका पुण्यातील (Pune) नामचीन गुंडांना आणि त्यांच्या टोळीप्रमुखांना दिला आहे. आज (6 फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके याच्यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख म्होरक्यांसह इतर 200 ते 300 गुंडांची परेड घेतली. (cp Amitesh Kumar gave the first blow to the notorious gangsters and their gang leaders in Pune.)

आगामी निवडणुकांच्या दिवसांमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. निवडणुकीच्या दिवसांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करायचे नाही, असा दमच आयुक्तांनी यावेळी भरला.

Sanjay Raut : पुण्यातल्या गुंडांना राजकीय वरदहस्त? ‘तो’ फोटो पोस्ट करत राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर घणाघात…

वरील कोणतेही कृत्य निदर्शनास आले तर कलम 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल असेही इशाराही दिला. त्यानंतरही उल्लंघन झाले तर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा दम पोलिसांनी या गुंडांना दिला. याशिवाय जामीनावर असलेल्या गुंडांचे सध्या काय सुरु आहे, कोण, कुठे काम करतो, कोण कोणत्या भागात राहयाला आहे याची माहितीही पोलिसांनी घेतली.

राजकीय नेत्यांची अन् गुंडांची भेट :

गत काही दिवसांपासून राजकीय नेते आणि गुंडांचे संबंध हा राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड मारणेची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीवरुन पार्थ पवारांवर त्यांच्याच पक्षातून टीका झाली. स्वतः अजित पवार यांनी देखील ही भेट चुकीची असल्याचे म्हटले. अशातच उल्हासनगरमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.

याच घटनेनंतर विरोधकांकडून सरकार गुंडांना राजाश्रय देत असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. अशात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसादिनी भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला. त्यानंतर लगेच कारवाईचे पाऊल उचलत ही भेट घडवून आणणाऱ्या अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी केली.

जनता वाऱ्यावर अन् गुंडांना राजश्रय, हेच का अच्छे दिन? विजय वडेट्टीवारांचा जळजळीत सवाल

त्यानंतर आज राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातीलच दुसरा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ याने भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला. यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता-पुत्राकडून मिळतो का?, असा सवाल करत घणाघात केला.

सोबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याचा आरोप करत शिंदे सरकारवर तोफ डागली. जनता वाऱ्यावर अन् गुंडांना राजश्रय, हेच का अच्छे दिन? असा सवालही त्यांनी केला. यानंतर आता पुण्याच्या पोलील आयुक्तांनी या गुंडांनाच भेटायला बोलावून दम भरल्याने विरोधकांच्या टिकेचा सरकारने चांगलाच धसका घेतल्याचे बोलले जात आहे.

follow us

वेब स्टोरीज