Download App

क्रिकेटच्या चेंडूने केला घात, अवघड जागी बसला मार, खेळाडूनं सोडला प्राण

क्रिकेट खेळत असताना चेंडू अवघड जागी लागल्याने अकरा वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

Pune News : क्रिकेट खेळत असताना चेंडू अवघड जागी लागल्याने अकरा वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना पुणे शहरातील लोहगावमधील जगद्गुरू इंटरनॅशनल शाळेजवळील एका स्पोर्ट्स अॅकॅडमीत गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शौर्य उर्फ शंभू कालिदास खांदवे असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. त्याचे वडील प्रगतीशील शेतकरी आणि व्यावसायिक आहेत.

Pune News :पुणे पोलिसांची धडक कारवाई! महिनाभराच्या मोहिमेत 42 पिस्टल अन् काडतूसे जप्त

याबाबत विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभू हा सहावीत शिकत होता. सध्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. या सुट्टीत शंभू गुरुवारी (दि.2 मे) इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. यावेळी अचानक एक चेंडू त्याच्या अवघड जागी लागला. यानंतर तो मैदानातच कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्याच्याबरोबर खेळायला आलेली मुलेही घाबरून गेली. या मुलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

यानंतर त्याच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचं उत्तर मिळू शकेल अशी माहिती विमाननगर पोलिसांनी दिली. दोनच महिन्यांपूर्वी त्याचे मांजरीतील क्रीडा संकुलात नाव नोंदवण्यात आले होते. येथे वस्ताद प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तो तयारी करत होता. तो धाडसी होता. म्हणून घरातील सदस्यांनी त्याला मल्ल म्हणून घडवण्याचा संकल्प केला होता. मात्र कुटुंबियांचं हे स्वप्न आता अधुरचं राहिलं आहे.

Pune Crime : पुण्यात मैत्रीला काळीमा! मित्रांकडून तरूणीचं आधी अपहरण अन् खंडणी मिळवल्यानंतर..

परंतु, त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याचा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ तो देखील या दुःखातून सावरलेला नाही. कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

follow us