Ajit Pawar On Amol Kolhe : ज्यांना मीच तिकीट दिलंय अन् खासदारही केलंय त्यांच्या आव्हानाला महत्व देत नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचं आव्हान धुडकावून लावलं आहे. दरम्यान, आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करुन अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांवर (Shivajirao Adhalrao Patil) गंभीर आरोप केले होते. त्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं असं खुलं आव्हानही दिलं होतं. कोल्हेंच्या आव्हानावर आता अजित पवार यांनी कोल्हेंचा खरपूस समाचार घेतला आहे. पुण्यात अजित पवार माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, आव्हान देणं हे त्या लोकांचं काम आहे, कोणीही आव्हान दिलं असेल तर मी त्याला फार महत्व देत नाही. जो आम्हाला आव्हान देतोयं, त्याला खासदारकीचं तिकीट मीच दिलं होतं, अन् खासदारही मीच केलं आहे. त्या खासदाराने मागील पाच वर्षांत जनतेशी जनसंपर्क ठेवलेला नाही. निवडून आल्यानंतर दोनच वर्षात ते राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे आले होते. इतर खासदारांप्रमाणे मला काम करायला शक्य होणार नाही, असं सांगत होते, आता आज असा काय चमत्कार घडला की ते पुन्हा काम करीत आहेत, असा सवालही अजित पवार यांनी केलायं. तसेच निवडून आल्यानंतर राजीनामा देणार होते की नाही? हे त्यांना खाजगीत विचारा, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
अमोल कोल्हेंनी काय आव्हान दिलं?
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार असताना सर्वाधिक संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारले होते. मी जेव्हा याबाबत विधान केलं तेव्हा पुरावा देण्याबाबतचं आव्हान त्यांनी मला दिलं होतं. माझ्याकडे त्यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांचा पुरावा आहे, आता त्यांनी आव्हान पूर्ण करुन निवडणुकीतून माघार घ्यावी, असं अमोल कोल्हेंनी आव्हान दिलं. तर आढळराव पाटलांची डायनालॉग कंपनी संरक्षण खात्याला अनेक गोष्टी पुरवत आहे. याच अनुषंगाने त्यांनी 29 एप्रिल 2016 रोजी संरक्षण खात्याने खरेदीसंदर्भात भारतीय कंपन्यांसाठी काही धोरण तयार केलंय का? असा सवाल विचारला होता. एवढचं नाहीतर टेंडर देण्यासाठी कोणत्या अटी असतात हे आधीच आपल्या पदाचा गैरवापर करुन माहित करुन घेतलं होतं, असा आरोप अमोल कोल्हे यांनी केला होता.
दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर आज अजित पवार यांना माध्यमांनी कोल्हेंच्या आरोपांवर सवाल केला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या आव्हानाला आम्ही फार महत्व देत नसून आम्ही कामाचे माणसं आहोत, आव्हान देणं हे त्यांचं काम असल्याची सडकून टीका त्यांनी केलीयं.
निवडणुका लागताच राज्यस्तरीय पक्ष अधिक मजबूत :
शरद पवार यांनी जे विधान केलं, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांच्या पक्षाबाबत काय बोललं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. देशात जसं जसं निवडणुका सुरु झाल्या, तसं तसं राष्ट्रीय पक्षांऐवजी राज्यस्तरीय पक्ष अधिक मजबूत झाले आहेत. विशेषत: दक्षिण भारतातील पक्ष मजबूत झाल्याचं दिसून आलंय. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळसारख्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.