Ajit Pawar replies Sharad Pawar : बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांंना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारानिमित्त कण्हेरी येथे काल जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. त्यांच्या या नकलेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता शरद पवार यांच्या या नकलेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांनी नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी एका मुलाखतीत दिली.
Video: चष्मा काढला अन् डोळे पुसले; शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल, व्हिडिओ व्हायरल
शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत. प्रगल्भ नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या मुलाप्रमाणे असलेल्याची नक्कल केली. हे अनेकांना आवडलेलं नाही. युगेंद्र किंवा अन्य कुणी नक्कल केली असती तर एकवेळ ठीक होतं. इतके दिवस वाटत होतं की फक्त राज ठाकरेच नक्कल करतात पण आत त्यात साहेबही दिसले. मी त्यांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल करणं योग्य नव्हतं असे अजित पवार म्हणाले.
पवार साहेबांनी काल भाषणात म्हटलं होतं की मी कधीच कोर्टाची पायरी चढलो नव्हतो पण तुमच्यामुळे त्यांना चढावी लागली असे विचारले असता अजित पवार म्हणाले, असं आजिबात नाही. निवडणूक आयोगाने निर्णय दिला. तुम्ही एकीकडे म्हणता जनतेच्या दारात जावं. न्यायव्यवस्थेच्या दारात जावं म्हणता. न्यायालय काय निर्णय देईल तो सगळ्यांनी मान्य करा. तु्म्ही म्हणता निवडणूक आयोगात जा. पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत तो जो निर्णय देतील तो मान्य करा. त्या पद्धतीनच आम्ही गेलो मग यात आम्ही काय चूक केली?
न्यायालयात प्रत्येकाचे वकील युक्तिवाद करत असतात. अशा वेळी आपण तिथं जाऊन काय करणार? आपल्याला काय अधिकार आहेत? मग फक्त सहानुभूती मिळवण्यासाठीच तुम्ही कोर्टात गेलात का? असे सवाल अजित पवार यांनी उपस्थित केले.
अजित पवारांकडून सिंचन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली A टू Z कहाणी
सुप्रिया नेहमी सांगते माझ्या मुलीचा वाढदिवस होता पण मला कोर्टात जावं लागलं. अरे पण मग मुलीचा वाढदिवसच करायचा कोर्टात कशाला गेलात? त्या दिवशी नव्हतं जायचं. वकिलांना विचारून पुढील तारीख मागता आली असती ना. हे जे भावनिक केलं जातंय ना हे बरोबर नाही. असं करू नका. मी कुणालाच कोर्टात जायला सांगितलं नाही. मी तर अजूनही कोर्टाची पायरी चढलो नाही. आम्ही वकिलांना पैसे देतो तेव्हा आमची बाजू वकील कोर्टात मांडतात. तसे ते देखील वकिलांना पैसे देतात असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.