Sharad Pawar : महाविकास आघाडी नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार?, शरद पवारांनी काय दिलं उत्तर
Sharad Pawar on Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज सकाळी पवार यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी पत्रकारांनी, काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत याबाबत शरद पवार यांना विचारले. तेव्हा पवार यांनी एका वाक्यात हा विषय संपवत कार्यकर्ते जर मागणी करत असतील तर यात काहीच चुकीचं नाही असं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढणार आहेत. ते एकत्र येऊन निर्णय घेतील. या तीन पक्षांतील एखादी जागा कुठल्या पक्षाने लढवावी, यासंबंधीचा विचार एकवाक्यतेने करावा लागेल. सध्या ती प्रक्रिया चालू आहे. येत्या ८ ते १० दिवसांत महाविकास आघाडीची जागावाटप बैठक घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले आहेत. तसंच, कुठल्याही पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला नेता राज्यकर्ता व्हावा असं वाटत असेल तर यामध्ये काहीच चुकीचं नाही. नागपूर शहरातील काँग्रेसच्या सर्व 6 जगांवरील दाव्याबाबत पवार म्हणाले, “जर ते म्हणत असतील सहाच्या सहा जागा लढवणार असं म्हणत असतील तर त्यावर मला आता काहीही बोलायचं नाही असंही ते म्हणाले
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी इच्छुकांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि वरिष्ठांची टीम मुलाखती घेतील. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही. त्यापूर्वी माझ्यासारख्याने मत व्यक्त करणे योग्य नाही. सध्या कुठेही गेले, तरी निवडणूक लढवणारे इच्छुक येऊन भेटत आहेत. आमची आघाडी आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत, असंही ते म्हणाले.
भाजप निर्दयी पक्ष! पहिला नंबर अजित पवारांचा अन् निवडणुकीनंतर गद्दारांचा; राऊतांनी थेटच सांगितलं
मराठा व धनगर आरक्षणासंबंधी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबतच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, असे प्रश्न सामंजस्याने सोडवायचे असतात. तणाव वाढण्याचे काही कारण नाही. जात, धर्म काही असले तरी आपण भारतीय आहोत, महाराष्ट्राचे घटक आहोत. आपल्या सर्वांमध्ये सामंजस्य कसं करता येईल, यासंबंधीची भूमिका या क्षेत्राचे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकारनेसुद्धा अशा प्रश्नांसंबंधी लोकांना विश्वासात घेऊन त्याची पूर्तता कशी करता येईल, वातावरण चांगलं कसं राहील, याकडे लक्ष देऊन खबरदारी घेतली पाहिजे असंही ते म्हणाले.