पुणे : अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एक 30 वर्षीय महिलेविरुद्ध हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने पोलीस (Police) स्थानकात तक्रार दाखल केली होती. (Extortion demand of Rs 20 lakh from woman threatening to reveal immoral relationship)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित तरुण आणि आरोपी महिला यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रित आणि नंतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणाने आपल्याला हे संबंध पुढे चालू ठेवायचे नसल्याचे महिलेला सांगितले. मात्र महिलेला हे संबंध पुढे ठेवायचे होते.
यानंतर आरोपी महिलेने गर्भवती असल्याची बतावणी पीडित तरुणाकडे केली. तसेच माझ्याशी संपर्क तोडल्यास अनैतिक संबंध उघड करेल आणि तुझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करेल, अशी धमकी दिली. सोबतच आपले असलेले संबंध कायम ठेवावे लागतील, असे सांगून पीडित तरुणाकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.
आरोपी महिलेच्या सततच्या या धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणाने हडपसर पोलील स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.