अजितदादांच्या गावात भाजपचा चंचू प्रवेश : काटेवाडीच्या ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच ‘फुललं कमळ’

अजितदादांच्या गावात भाजपचा चंचू प्रवेश : काटेवाडीच्या ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच ‘फुललं कमळ’

पुणे : पवार कुटुंबियांचे मूळ गाव काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ‘दादा’ ठरले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पुरस्कृत पॅनेलने 16 पैकी 14 जागांवर मुसंडी मारत काटेवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तर भाजप (BJP) पुरस्कृत पॅनेलचेही दोन उमेदवार विजयी झाले आहेत. काल (5 नोव्हेंबर) 16 जागांसाठी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (6 नोव्हेंबर) या जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. (Two candidates of the BJP-sponsored panel have won in the village panchayat in Katewadi)

मागील अनेक वर्षांपासून काटेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र राष्ट्रवादीतील बंडानंतर इथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सत्ता येणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कौल देणार याबाबत चर्चा सुरु होत्या. अखेरीस आज जाहीर झालेल्या निकालात राष्ट्रवादी (अजित पवार) पुरस्कृत पॅनेलने 16 पैकी 14 जागांवर मुसंडी मारत काटेवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.

Supriya Sule : मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल

भाजपचाही चंचुप्रवेश :

या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजितदादांच्या गावात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले आहे. भाजप पुरस्कृत पॅनेलचे दोन उमेदवार या निवडणुकीत निवडून आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता असलेली ही ग्रामपंचायतच ताब्यात घेण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली होती. मात्र भाजपला दोन जागांवर यश मिळालं आहे. दरम्यान, सत्ता मिळाली नसली तरीही इतिहासात पहिल्यांदाच काटेवाडीत कमळ फुलल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भाजप पुरस्कृत पॅनेलचे अजित पवार पुरस्कृत पॅनेलवर आरोप :

दरम्यान,  या निवडणुकीत अजित पवार गटाच्या पॅनलकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप काल भाजपने केला होता. भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे म्हणाले की, ही निवडणूक गावकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे. गावातील भ्रष्टाचार आणि दहशत कमी करायची आहे. गावात काहीच व्यवस्था नाही. नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी येथील परिस्थिती आहे, असेही कचरे म्हणाले होते. अजित पवार गटाने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहोत, असे या गटाने स्पष्ट केले.

ललित पाटीलला पळवून लावण्यात डॉक्टरचा हात असेल असं….; ससूनच्या डीननं स्पष्टचं सांगितलं…

भाजपने पुरावे द्यावेत- काटे 

काटेवाडीचे माजी सरपंच विद्याधर काटे यांनीही भाजपाचे आरोप फेटाळून लावले होते. काटे म्हणाले होते, आम्ही पैसे वाटले नाहीत. काटेवाडीमध्ये पूर्ण विकास केला आहे. आम्ही भ्रष्टाचार केल्याचे पुरावे भाजपने द्यावेत. आम्ही सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकतो. काटेवाडीत अजित पवार यांच्या मार्गदर्शनात चांगले काम सुरू आहे. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहोत. अजितदादांच्या नेतृत्वात आमचा पॅनेल शंभर टक्के निवडून येईल, असा विश्वास विद्याधर काटे यांनी व्यक्त केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube