आरक्षणाचा प्रश्न BJP मुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर समाजाला फसवलं; पटोलेंची घणाघाती टीका

  • Written By: Published:
आरक्षणाचा प्रश्न BJP मुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर समाजाला फसवलं; पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation)मागणीसाठी सरकारच्या नाकीनऊ आणणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. जरागेंनी सरकारला दिलेली ४० मुदत संपली असून अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

ते मुख्यमंत्री होते, मी विरोधीपक्ष नेता; शरद पवारांनी अंतुलेंबरोबरच्या संघर्षाची आठवण सांगितली 

मराठा समाजानंतर धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला होता. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी समाजाने आर-पारची लढाई सुरू केली. आरक्षणाच्या मुद्दावरून महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यावर बाोलतांना पटोले म्हणाले की, भाजपमुळेच आरक्षणाचा मुद्दा चिघळला असून फडणवीसांनी मराठा, धनगर आणि ओबीसी समाजाला फसवले, असा आरोप त्यांनी केला.

पटोले म्हणाले की, राज्यात आरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला आहे. आजच्या या परिस्थितीला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. 2014 मध्ये भाजपने जे विष पेरले, त्याचीच विषवलल्ली आज पसरलेली दिसत आहे. भाजपने मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते आणि राज्यात व केंद्रात त्यांचे सरकार आल्यानंतर भाजपने आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते, त्यासाठी नारायण राणे समितीही नेमण्यात आली होती. पण, नंतर आलेल्या भाजपने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच राज्यात आजची परिस्थिती निर्माण झाल्यचाा आऱोप पटोलेंनी केला.

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने 2018 मध्ये घटनादुरुस्ती करून राज्याचे आरक्षणाचे अधिकार हिरावून घेतले. मात्र राज्याला कोणतेही अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरक्षणाचा कायदा करून समाजाचा विश्वासघात केला. आज आरक्षणाचा जो प्रश्न चिघळला आहे, त्याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप पटोलेंनी केला.

जरांगे पाटील गेल्या दिड महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. अंतरवली सराटी गावात त्यांनी दीर्घकाळ उपोषण केलं. याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. एकनाथ शिंदेंनी आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत मागितली होती. आता चाळीस दिवस झाले तरीही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. आता जरांगे पाटलांनी आमरण उषोषण सुरू केल्यानं सरकार मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube