पुणे : तुमच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा (BJP) कुठलाही कार्यकर्ता पुरेसा आहे. लोकसभेसाठी भाजपने कुठल्याही कार्यकर्त्याला अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले तरी तो तुमचा पराभव करेल, असे म्हणत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी काँग्रेस (Congress) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या आव्हानातील हवाच काढली. ते पुण्यात बोलत होते. (Former BJP MLA Jagdish Mulik responded to Congress MLA Ravindra Dhangekar’s challenge.)
आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावावर खल सुरु आहे. यावर बोलताना धंगेकर म्हणाले, मला काँग्रेस पक्षाने संधी दिली तर आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत. ते येत्या लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या पाठीशी राहतील. त्यामुळे पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवावी किंवा त्यांच्या वरीष्ठ नेत्यांनी लढवावी, यात मीच जिंकणार असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील भाजप नेत्यांना आव्हान दिले होते.
यावर बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, रवींद्र धंगेकर हे अपघाताने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. 2009 साली तुम्ही लढला, 2014 ला लढला पण तुमचा दारुण पराभव झाला. आता तुम्ही लोकसभेची स्वप्न पाहत आहात. पण तुम्ही लोकसभा तर सोडाच तुम्ही विधानसभेला पण पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासासाठी, बातम्यांमध्ये राहण्यासाठी तुम्ही राज्याचे कर्तबगार नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करत असाल, त्यांच्याशी तुमची तुलना करत असाल तर तुम्हाला पुणेकर माफ करणार नाहीत. सगळ्या पुणे शहराने तुमचा रूप पाहिलं आहे. आमदार व्हायच्या अगोदर आपल्याबद्दल जो लोकांचा भ्रम होता तो आता संपला आहे. तुमच्याबद्दलचा लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. तुमच्यावरती लोकांनी अपेक्षा ठेवून मतदान केले त्यांच्या अपेक्षा आता तुमच्याकडून संपलेल्या आहेत.
पुणेकरांना, कसब्यातल्या लोकांना माहिती आहे तुम्ही पुणेकरांची दिशाभूल करत आहात. देवेंद्रजी राज्याचे नेते आहेत, ते पाच वर्ष मुख्यमंत्री असताना पारदर्शक सरकार आपल्या महाराष्ट्राला दिले, महाराष्ट्रातल्या गरिबांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी सर्व सणातील लोकांसाठी देवेंद्रजींनी काम करून दाखवले. महाराष्ट्राला पुढे नेले. आज देवेंद्र फडणवीस लढतील किंवा लढणार नाहीत, हा वेगळा प्रश्न आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी कुठल्याही लोकसभा मतदारसंघांमध्ये ते निवडून येऊ शकतील एवढे त्यांचे कर्तृत्व आहे.
देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्यांवर आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची ही तुमची जुनी सवय आहे, ती विसरून जा. तुम्ही लोकसभा तर सोडा विधानसभेमध्ये पण टिकू शकत नाही हे क्लियर आहे. तुमच्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता पुरेसा आहे. लोकसभेसाठी भाजपने कुठल्याही कार्यकर्त्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले तरी तो तुमचा पराभव करेल ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उगीचच आपण तोंडाच्या वाफा करू नका. आपण तोंडाच्या वाफा करता हे जनतेला दिसत आहे, जनता तुम्हाला माफ करणार नाही. लोकसभा असेल, विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे, असेही मुळीक म्हणाले.