पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससूनच्या डॉक्टरांपाठोपाठ आता बाल हक्क न्यायमंडळ (Juvenile Justice Board) अडचणीत आले आहे. अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासांत जामीन कसा काय दिला, जामीन देताना कायदेशीर बाबींचे पालन झाले होते? अशा विविध मुद्द्यांवर बाल हक्क न्याय मंडळाच्या सरकारनियुक्त सदस्यांची चौकशी होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या समितीची स्थापना केली आहे. (Juvenile Justice Board is going to investigate how the juvenile accused was granted bail in just 15 hours.)
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समितीचे प्रमुख उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील तरतुदींनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे, ती पुढील आठवड्यापर्यंत चौकशीचा अहवाल सादर करील. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती समोर येत आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात आलिशान कार चालवत दोघांना चिरडले. त्यानंतर अल्पवयीन मुलास बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला होता. तसेच 14 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याबरोबरच अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अजब शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या आदेशानंतर चहुबाजूकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.
बाल न्याय मंडळाचा हा निर्णय धक्कादायक होता अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी जामीनाबाबत फेरविचार याचिका दाखल केली होती. मंडळाने जामीनाच्या निर्णयाचा पुनर्विचार करत जामीन रद्द केला. तसेच या अपघाताचा संपूर्ण तपास होईपर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. या अपघात प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान ते ठरवले जाणार आहे. तोपर्यंत म्हणजेच 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.