Pankaja Munde : पक्षाने मला महादेव जानकरांबाबत (Mahadev Jankar) जबाबदारी दिल्यास मी जानकरांना थांबवू शकते, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पक्षाकडे बोट दाखवलं आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Loksabha Election) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच एकच चर्चा रंगली होती. महादेव जानकर यांची भाजपसोबत युती झाली नाही तर जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्याचे वरिष्ठ नेत्यांवर युतीबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महादेव जानकराबाबतची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली तर मी ही जबाबदारी निभावणार. कोणाला सोबत घ्यायंच हे वरिष्ठ नेते ठरवणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात मोहोळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
‘गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट नाही’; पवारांच्या बहिण सरोज पाटलांनी थेट सांगितलं
पंकजा मुंडे म्हणाल्या, मुरलीधर मोहोळ हे गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे आहेत. मी आज त्यांची मोठी बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला आले आहे. पुण्यानंतर आता नगरलाही शुभेच्छा देण्यासाठी जाणार असून त्यानंतर बीडला जाणार आहे. मोहोळ यांच्या रुपात पुण्याला एक चांगला खासदार मिळो, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
तसेच बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती असल्याचा सवाल माध्यमांमधून विचारण्यात आला. त्यावर मुंडे म्हणाल्या, बीड जिल्हा हा पुढारलेला आहे. बीड जिल्ह्याने विविध समाजाचे खासदार निवडून दिले आहेत. व्होटबॅंकेचं राजकारण बाहेरुन दिसत असतं. मी बीडमध्ये पालकमंत्री म्हणून काम केलंयं. प्रत्येक समाजाशी संबंध असून कुठलीही कटुता नाही. सर्वसमावेशक असं माझं धोरण आहे. माझा मतदारांवर पूर्ण विश्वास असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
‘जगातील लोकप्रिय नेते, १० वर्षांत एकही सुट्टी नाही, मोदींना दैवी शक्ती’; अजितदादांच्या तोंडून कौतुकाचा वर्षाव
विरोधक मला निवडून येण्यासाठी उमेदवार देतील ही लोकशाहीत गंमतच असून निवडणूक माझ्यासाठी काही नवीन नाही. मी 2004 पासून काम करत आहे. ही माझी पाचवी निवडणूक असून शरद पवार जे करीत आहे त्यात माझा काही कटाक्ष नाही. मला माझ्या मतदारसंघातील मतदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं मत मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सध्या मी माझ्या मतदारसंघावर आणि माझ्या उमेदवारीवर लक्ष देत असून राज्याच्या राजकारणाबाबतची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर ती मी पार पाडणार आहे. महादेव जानकरांबाबत मला काही जबाबदारी दिली तर निभावणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत अहमदनगरमधून विद्यमान खासदार सुजय विखे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर बीडमध्ये विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.