मावळ : भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) या प्रमुख तीन पक्षांच्या महायुतीने एकत्र येत महाराष्ट्राचा कारभार हाकला तर लोकसभा निवडणूक देखील एकत्र लढवली आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी एकमेकांशी चांगलं जुळवून घेतलं मात्र स्थानिक नेते महायुतीचे गणित बिघडवताना पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते जीव तोडून प्रचार करताना दिसत आहेत. मात्र मावळातील भाजपचे स्थानिक नेते युतीधर्म पाळताना दिसत नाहीत.
महायुतीमध्ये ज्या पक्षाचा आमदार तोच संभाव्य उमेदवार असा अघोषित नियम आहे. या नियमानुसार राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनाच महायुतीचा उमेदवार म्हणून मावळातून उमेदवारी मिळेल,अशी दाट शक्यता आहे. मात्र, भाजपमधील इच्छुकांनी युतीधर्म बाजूला करून काही झालं तरी आपणच निवडणूक लढवणार असा निर्धार केल्याने महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र चव्हाट्यावर आलं आहे.
रवींद्र भेगडे हे भाजपकडून मावळ विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील शेळके यांना तिकीट मिळण्याची जास्त शक्यता आहे. इच्छा व्यक्त करणे चूक नाही मात्र वरिष्ठ नेते आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी केलेल्या युती-आघाड्यांचं पालन करणं हे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एक प्रकारे बांधिलच असतं आणि या शिस्तीला पाळणारा पक्ष म्हणून भाजपची ख्याती आहे. मात्र, तरी देखील रवींद्र भेगडे हे आक्रमक प्रचार करत असून वेगळी भूमिका घेत असल्याने भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. महायुतीचा उमेदवारच काम करायचं नसेल तर आमदारांची संख्या कशी वाढेल? आणि देवेंद्र फडणवीस परत (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री कसे होतील? अशी कुजबूज मावळात सुरू झाली आहे.
भाजप शिस्त पाळणारा पक्ष मात्र आपल्याच पक्षातील नेते पदाधिकारी याचे उल्लंघन करत असल्याने कंटाळून भाजपमधील काही स्थानिक पदाधिकारी आणि नेते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, मावळत चाललेलं भाजप नेत्यांचं वागणं पाहून सुनील शेळके यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. शेळके आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर देखील भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोयरीक जुळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Devendra Fadnavis : राजीनाम्याचं काय झालं? फडणवीसांनी दिल्लीतील स्टोरी सूचक शब्दांत सांगितली