Download App

‘आज माझ्याकडं अर्थखातं, पुढं टिकेल सांगता येत नाही’; अजितदादांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट !

Ajit Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दोन महिने उलटून गेले आहेत. आताच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी बारामतीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. अजितदादा म्हणाले, आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही.

बारामतीत 42 कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकुलाचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मार्केट कमिटीला 5 कोटी रुपये देऊन जागा घेण्यात आली. म्हणजे मार्केटला जागा देताना मी फुकट देतो पण, त्यांची जागा घेताना 5 कोटी दिले असेही अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री होतो. त्यावेळीही अनेक योजनांच्या फाइल यायच्या त्यात आधी बारामतीचं नाव शोधायचो. नाव नसेल तर टाकायचं आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला 42 कोटी रुपयांचं मॅग्नेटचं काम मिळालं.

Ahmednagar Rain : नगरमध्ये धुव्वाधार पाऊस, शहरातील रस्त्यांवर ‘महापूर’

अजित पवार सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्यासह काही आमदार घेऊन आले. अजित पवार यांना अर्थखातं देऊ नये यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केला होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने त्यांना राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. इतकंच नाही तर त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांनाही वजनदार खाती दिली. त्यानंतर अजितदादांनीही आपल्या स्टाइलमध्ये कारभार सुरू केला. 

शिंदे गट आपल्यावर नाराज आहे याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे सुरुवातीला निधी वाटपात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांचीही काळजी घेतली. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा विरोध काहीसा मावळला. यानंतर अजितदादा महायुतीच्या सरकारमध्ये रुळले असे वाटत असतानाच मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या बातम्या आल्या. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि निधीच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही त्यांचे खटके उडू लागले. अशा अनेक कारणांनी त्यांचा कार्यकाळ चर्चेत आहे. आता खुद्द अजित पवार यांनीच अर्थमंत्रीपदाबाबत असे वक्तव्य केल्याने आगामी काळात राजकारणात परत काही भूकंप होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Eknath Khadse : अजितदादांनाही डावललं जात पण.. नाथाभाऊंनी सांगितलं महायुतीतलं पॉलिटिक्स

Tags

follow us