पिंपरी चिंचवडमध्ये ‘अबकी बार 100 पार’ हा नारा यशस्वी ठरेल, आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला विश्वास

भाजप आमदार शंकर जगताप यांनी टीकेपेक्षा विकासकामांवर भर देणार असून, आरोपांना कामाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल, ठामपणे सांगितलं.

  • Written By: Published:
Untitled Design (252)

MLA Shankar Jagtap’s ‘Abki Bar 100 Par’ in Pimpri Chinchwad : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी असलेलं आपलं व्हिजन, आतापर्यंत राबवलेले प्रकल्प आणि विरोधकांच्या आरोपांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. टीकेपेक्षा विकासकामांवर भर देणार असून, आरोपांना कामाच्या माध्यमातूनच उत्तर दिलं जाईल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. राज्यभर भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीमध्ये असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. युतीत असताना परस्परांवर टीका होणं योग्य नसून, अशा गोष्टी जनतेच्या लक्षात येतात. त्यामुळेच जनता योग्य निर्णय घेईल आणि विकासालाच कौल देईल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

2017 नंतर महापालिकेत मोठा बदल झाल्याचं त्यांनी नमूद केलं. थेरगाव येथील अत्याधुनिक हॉस्पिटल, शहरभर उभं राहिलेलं रस्त्यांचं जाळं, तसेच 2017 पूर्वी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये समाविष्ट नसलेल्या पुनावळे, दिघी, चिखली, मामुर्डी आणि रावेत या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. आज या भागांतून महापालिकेला सर्वाधिक कर मिळत असून, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 860 एमएलडी पाणीपुरवठ्याची क्षमता अपग्रेड करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण आणि शिक्षण या मुद्द्यांवरही विशेष भर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

महापालिका कर्जबाजारी झाल्याच्या आरोपांवर उत्तर देताना, विकासकामांसाठी कर्ज घेणं अपरिहार्य असतं, असं आमदार जगताप म्हणाले. राज्य, देश किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर कर्ज घेऊनच विकास केला जातो. जीएसटी लागू झाल्यानंतर महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत बदलले असून, आज प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स, जीएसटी आणि एलबीटी अनुदानावरच महापालिका अवलंबून आहे. काळ बदलतो तसा खर्चही वाढतो, हे लक्षात घ्यायला हवं, असं ते म्हणाले.

ब्रेकिंग : झेडपीच्या निवडणुका लांबवणीर; सुप्रीम कोर्टाकडून राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य

हिंजवडी हा भाग महापालिकेच्या अगदी जवळ असून त्याचा मोठा बोजा पिंपरी–चिंचवडवर येतो. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, एमआयडीसी, पीएमआरडीए आणि पीएमसी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. नवीन रस्त्यांची कामं सुरू झाली असून, लवकरच अनेक समस्या सुटतील, असा दावा त्यांनी केला.

पिंपरी–चिंचवड हा भाजपचा बालेकिल्ला असून, येथील सर्व स्तरातील नागरिक विकासाला प्राधान्य देणारे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामं झाली असून, येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे 100 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

काही ठिकाणी कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्याने ते राष्ट्रवादीत गेले असले, तरी त्याचा भाजपला कोणताही फटका बसणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. स्वतः आमदार म्हणून नवे असलो तरी गेल्या 30-35 वर्षांचा राजकीय अनुभव असून, टीकेपेक्षा विकासावरच भर राहील, असं त्यांनी सांगितलं. न्यू सांगवी आणि सांगवी परिसरात मोठ्या विकासकामांची घोषणाही यावेळी करण्यात आली.

थेरगावमध्ये उभारलेलं 200 खाटांचं हॉस्पिटल वायसीएमच्या धर्तीवर असून, त्याच ठिकाणी आणखी अपग्रेडेशन केलं जात आहे. महेश लांडगे यांच्याशी कोणतीही राजकीय स्पर्धा नसून, आम्ही एकाच पक्षात एकत्र काम करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. येणाऱ्या काळात पिंपरी-चिंचवडचा महापौर भाजपचाच होईल आणि “अबकी बार 100 पार” हा नारा यशस्वी ठरेल, असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

follow us