Rupali Chakankar Call Dalit Girl : कोथरूड पोलीस ठाण्यात दलित (Pune News) तरुणींवर कथित मारहाण, शिवीगाळ आणि लैंगिक अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्या पीडित मुलींनी जोरदार आंदोलन छेडलं. मात्र, तब्बल 18 तास चाललेल्या या आंदोलनानंतरही संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar Call Dalit Girl) यांनी लक्ष घातलं असल्याचं समोर येतंय. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांनी तातडीने चौकशीचे निर्देश दिले आहेत.
फोटो, टाचण्या, काळी बाहुली आणि लिंबं! राजगडमध्ये काळ्या करणीचा अघोरी प्रताप, गावकरी भयभीत
राज्य महिला आयोगाची तत्काळ दखल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ( Maharashtra Womens Commission) रूपाली चाकणकर यांनी पीडित मुलींशी थेट फोनवर संपर्क साधला. त्यांनी पूर्ण घटना समजून घेतली. याबाबत तात्काळ पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून चौकशीचे आदेश देणार असल्याचं जाहीर केलं. या प्रकारात जर खरोखर पोलीस कर्मचारी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. तसंच, त्या महिलेस मदत करणाऱ्या तरुणींवर अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येईल, असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय घडलं होतं?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या त्रासाला कंटाळून ती महिला पुण्यात आश्रयासाठी आली. तिच्या मदतीस धावून आलेल्या तीन तरुणींना, कोणतीही पूर्वसूचना न देता, कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. केवळ ताब्यातच नव्हे, तर या तीन मुलींवर पोलिस स्टेशनमध्ये जातिवाचक अपशब्द वापरण्यात आले, शिवीगाळ आणि मारहाणदेखील करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अमोल कामटे, आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर मारहाण अन् गैरवर्तनाचे थेट आरोप करण्यात आलेत.
रात्रभर आंदोलन, पोलिसांकडून अजूनही दुर्लक्ष
या घटनेच्या निषेधार्थ पीडित मुली आणि त्यांचे सहकारी 3 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते. रात्री साडेतीन वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहिलं. या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नेते प्रशांत जगताप, भारिप-बहुजन महासंघाच्या नेत्या सुजात आंबेडकर आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित मुलींना पाठिंबा दिला. त्यांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. परंतु, या चर्चेनंतरही कोणत्याही अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.