Download App

Maratha Reservation : ‘त्या’ 40 दिवसांत सरकारने काय केलं? देसाईंनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. याआधी त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. या मुदतीत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. या मुदतीत सरकारने काहीच केले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांवर आता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देत सरकारची बाजू मांडली आहे. देसाई आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चाळीस दिवसांच्या काळात सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीच केले नाही असे म्हणता येणार नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी जवळपास 23 बैठका घेतल्या, असे मंत्री देसाई म्हणाले.

Sanjay Raut : फडणवीसांचा इतिहास कच्चा, मोदींच्या कृपेने.. ‘त्या’ आरोपांवर राऊतांचे उत्तर

मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला. या काळात सरकारने काहीच केलं नाही असं भासवलं जात आहे. मात्र, या मुदतीत सरकारने काम केलं. मराठा आरक्षणासाठी समिती गठीत केली. त्यांना लागणारी सर्व यंत्रणा उभी केली. त्यामुळे सरकारने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही. सध्या तेलंगणात आचारसंहिता असल्याने कागदपत्रे देण्यास अडचणी येत आहेत. स्वतः मुख्यमंत्री शिंदे तेलंगणाच्या मु्ख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. त्यामुळे शिंदे समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतेवेळी त्यांचा हातही थरथरत होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज किंवा उद्या चर्चेसाठी यावं. सरकारशी अद्याप कोणताच संवाद झालेला नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळालेली नाहीत. दोन दिवसांत आरक्षण मिळेल असे जर तानाजी सावंत म्हणत असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे का म्हणत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर दबाव आणणार; आमदार संग्राम जगतापांचे मोठे विधान

फडणवीसांच्या कानात बोळे घातले आहेत का ?

प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होत नसते समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाहीत. फडणवीसांच्या कानात काय बोळे घातले आहेत का? असा सवाल करत आरक्षण द्यायचे की नाही एकदाच काय ते सांगून टाकायचे बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

follow us