Download App

Rohit Pawar : ‘आता भाजप माफी मागणार का?’ मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या कंपनीला दिलं कंत्राट

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शरद पवार यांची साथ सोडून गेलेले हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना निशाण्यावर घेतले आहे. राज्य सरकारने समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याच्या कंत्राटावरून सरकारवर हल्लाबोल करत भाजप (BJP) आता लोकांची माफी मागणार का?, असा सवाल केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत राज्य सरकारचा आणखी एक कारभार चव्हाट्यावर आणला आहे. ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ साहेब यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीने अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालविण्यास दिल्याचा आणि मनी लाँडरिंग झाल्याचा गंभीर आरोप मविआ सरकारच्या काळात भाजपकडून करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदा आणि कोल्हापूर दौरा या माध्यमातून रान उठवलं आणि आज याच कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्याचं कंत्राट देण्यात आलं. यामुळं राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का?, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी या ट्विटद्वारे केला आहे.

रोहित पवार सध्या राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांवर टीका करत आहेत. याआधीही त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपबरोबरच हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाची कंपनीला टार्गेट केले आहे. त्यांच्या या टीकेवर आता भाजप आणि अजित पवार गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर जानेवारी महिन्यात ईडीने छापा टाकला होता. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही या कारवाईत सहभागी झाले होते. ईडीचे जवळपास 20 अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचत त्यांनी कारवाई केली होती. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याच प्रकरणात ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरही पुन्हा एप्रिल महिन्यात पु्न्हा ईडीने छापेमारी केली होती.

Tags

follow us