हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकलाय. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले.

सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते.

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे नाव आहे. याशिवाय, ते शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आजच्या धाडसत्रानंतर ईडीने हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची कारवाई केल्यास तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धक्का ठरेल. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासह त्यांच्या कार्यालयांचीही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे.

हडपसर मधील अॅमनोरा आणि कोंढव्यात इडीची छापेमारी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून १५८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यामध्ये हसन मुश्रीफ यांचा जावई आणि मुलगा सहभागी असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube