Download App

Pune Politics : काँग्रेसला पुण्याच्या बदल्यात दुसऱ्या जागेची राष्ट्रवादीकडून ऑफर!

विष्णू सानप

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा (Pune Lok Sabha ) रिक्त झाली आहे. यामुळे पोट निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून करण्यात येत असून नेत्यांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.

दरम्यान, पुणे लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) काँग्रेसकडे आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून (NCP) करण्यात आली असून त्या बदल्यात काँग्रेसला दुसऱ्या जागेची ऑफर देखील राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केली आहे. त्यांनी ‘लेट्सअप मराठी’शी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे.

जगताप म्हणाले,भारतीय जनता पार्टीला हरवणे ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढली आहे. मात्र, ज्या ठिकाणी काँग्रेसचा सातत्याने पराभव होतोय किंवा राष्ट्रवादीचा पराभव होतोय त्या ठिकाणी आम्ही जागांची अदलाबदल केली आहे. आम्ही हिंगोलीमध्ये तर राष्ट्रवादीने जिंकलेली जागा स्वर्गीय राजीव सातव यांच्यासाठी सोडली होती.

आता काँग्रेसने व मित्रपक्षांनी आपले सर्वे करावे आणि राष्ट्रवादीची ताकद जर पुण्यात त्यांच्यापेक्षा जास्त असेल तर पुण्याची जागा ही राष्ट्रवादीला मोठ्या मनाने सोडण्यात यावी त्या बदल्यात अदलाबदल करण्याची जर वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेस तशी तयारी दाखवेल, असे आवाहन त्यांनी काँग्रेसला केले आहे.

Sanjay Raut : सरकार गेंड्याच्या कातडीचं, त्यांना मन असतं तर…

दरम्यान, पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद किती आहे हे सांगत असताना जगतापाने त्याचा हिशोबच मांडला. ते म्हणाले, 2007 ते 2017 पर्यंत पुणे महानगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 42 जागा तर काँग्रेसच्या नऊ जागा निवडून आल्या. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालेला आहे.

मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसचा एकही आला नाही. याचा अर्थ आमची ताकद फार मोठी आणि काँग्रेसची कमी असा होत नाही. मात्र, आमची ताकद ही कागदावर आणि रस्त्यावर खूप मोठी आहे हे पुणेकरांना माहीत आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसपुढे शक्ती प्रदर्शन केल आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

दरम्यान, काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडली आणि आम्ही जर जिंकली तर हा फार मोठा संदेश देशभरात जाईल, असे जगताप म्हटले जरी असले तरी त्यांचं हे मत काँग्रेस आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पटेल का? आणि ते प्रशांत जगतापांसाठी राष्ट्रवादीला ही जागा सोडतील का? हे पाहणं देखील आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, तूर्तास तरी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

Tags

follow us