पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता पुण्यातून जुगाराचा नवीन प्रकार समोर आला आहे. (Pune) वानवडी परिसरात पैशांसाठी फायटर कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या सहा जणांना पोलीसांनी रंगेहात पकडलं आहे. ही झुंज म्हणजे जुगाराचा एक प्रकार आहे. कोंबड्यांना भिडवून त्यावर पैशांच्या बाज्या लावल्या जात होत्या. मात्र, आता पोलिसांनी अशाप्रकारे जुगार खेळणाऱ्या 6 जणांना बेड्या ठोकल्या आहे.
पुण्याच्या वानवडी परिसरात पैशांवर फायटर कोंबड्यांची झुंज लावली जात होती. याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी सर्व सहा आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलीसांनी सर्व आरोपींकडून 6 रंगीत फायटर कोंबडे, त्यांना ने-आण करण्यासाठी वापरलेल्या सहा पिशव्या, तीन मोटारसायकली, पाच मोबाईल फोन आणि 2580 रुपयांची रोकड असा एकूण 5 लाख 11 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोंबड्यांना झुंजीसाठी वापरताना त्यांना क्रूरपणे वागवलं जात असल्याचंही पोलीसांच्या लक्षात आलं आहे.
पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात स्टेटस्को; धर्मादाय आयुक्तांनी असा निर्णय का घेतला?
या कारवाईनंतर सर्व आरोपींवर वानवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(ब) आणि प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करणारा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. हे आरोपी किती दिवसांपासून अशी झुंज लावत आहेत? इतर कोणत्या ठिकाणी असा प्रकार सुरू आहे का? हे कोंबडे कुठून आणले? या प्रश्नांची उत्तरे पोलीसांकडून शोधली जात आहेत. हा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
अमोल सदाशिव खुर्द (रा. रविवार पेठ), मंगेश आप्पा चव्हाण (रा. भवानी पेठ), निखिल मनिष त्रिभुवन (रा. घोरपडी), अमिर आयुब खान (रा. घोरपडीगाव), सचिन सदाशिव कांबळे (रा. भवानी पेठ) आणि प्रणेश गणेश पॅरम (रा. कॅम्प) या आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.