Download App

“लोकसभेला मदत केलेले सगळे आमचेच”; बेनकेंच्या भेटीवर शरद पवारांचा कटाक्ष; अजितदादांचीही गुगली

शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात दाखल झालेले आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली.

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत (Maharashtra Politics) तशा राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. शरद पवारांची साथ (Sharad Pawar) सोडून अजित पवार गटात दाखल झालेले आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. या बातमीने राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेनकेंनी भेट घेतल्याने (Maharashtra Elections) या भेटीचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. मात्र, खुद्द शरद पवार यांनीच ही भेट राजकीय नव्हती. आम्हा दोघांत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही असं सांगून टाकलं. तर दुसरीकडे अजितदादांनीही या (Ajit Pawar) भेटीवर माध्यमांनाच उलट सवाल करत तुम्हीच बेनकेंना विचारा की शरद पवारांची भेट का घेतली?

या भेटीवर काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार या दोघांच्याही प्रतिक्रिया चर्चेत आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या निवासस्थानी आमदार बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीमागे आगामी विधानसभा निवडणुकीचा काही विचार आहे का अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र शरद पवारांनी यात राजकारण आणू नका असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! ‘पिपाणी’ चिन्ह गोठवलं, निवडणूक आयोगाचा निर्णय

लोकसभेला मदत केलेले आमचेच : शरद पवार

अतुल बेनके सध्या कोणत्या पक्षात आहेत मला माहिती नाही. पण, आम्हा दोघांत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या उमेदवाराचं काम केलं ते सगळे आमचेच आहेत असं माझं मत आहे. अतुल बेनके यांचे वडील वल्लभ शेठ बेनके माझे चांगले मित्र होते. अतुल हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यामुळे या भेटीत राजकारण आणू नका असे शरद पवार म्हणाले.

तुम्ही आता शरद पवारांनाच विचारा : अजित पवार

अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली म्हणून काय झालं? आज अनेक आमदार माझीही भेट घेत असतात. तुम्ही आता बेनकेंनाच विचारा की त्यांनी शरद पवारांची भेट घेतली? फक्त भेट घेतली म्हणून बिघडलं कुठं? असे सवाल अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनाच विचारले. निवडणुका जवळ आल्या की लोक इकडे तिकडे जातात. त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा असते. पण जागा आपल्याला सुटणार की नाही याबद्दल शंका असते. तेव्हा अशा घटना घडत असतात.

या विषयात माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. आता तर सुरुवात आहे. पुढे अशा गोष्टी जास्त प्रमाणात होतील. आमच्याकडेही काही लोक येऊ पाहत आहेत. पिंपरी चिंचवडमधील अजित गव्हाणे यांना गेल्या वेळी मी उमेदवारी देणार होतो. मात्र त्यावेळी ते विदेशात गेले होते, असेही अजित पवार यांनी सांगितले.

भाजपची मते आम्हाला मिळत नाहीत.. DCM अजित पवारांचा दावा तरी काय?

कोण आहेत अतुल बेनके ?

अतुल बेनके दिवगंत नेते वल्लभ शेठ बेनके यांचे पुत्र आहेत. सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जुन्नर मतदारसंघात विजय मिळवला होता. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर द्विधी मनस्थितीत असलेल्या आमदार बेनके यांनी अखेर शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या गटात जाणे पसंत केले होते. आता त्यांनी पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली असून या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.

follow us