Prashant Jagtap On Ajit Pawar : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस सुरुवात झाली असून 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोग लवकरच महानगरपालिका निडवणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे मात्र ही चर्चा नसून फक्त अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती झाली तर आपण राजकारणातून संन्यास घेणार असा इशारा देखील प्रशांत जगताप यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार की नाही याबाबत सध्या पुण्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की, पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) निवडणुकीसाठी आमचा पक्ष तयार असून आम्ही या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) म्हणून उतरण्याचा विचार करत आहोत. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना ठाकरे गटाशी (Shivsena UBT) आमचे दोन- दोन बैठका देखील झाल्या आहे. तसेच आम आदमी पार्टी आणि वंचितसोबत देखील आम्ही चर्चा करत आहे. या निवडणुकीसाठी 265 जणांनी सशुल्क अर्ज भरुन दिले आहेत. तर पुणे शहराचे वाटोळे महायुतीतील तीन पक्षांमुळे झाले असल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याची आमची मानसिकता नाही असं लेट्सअप मराठीशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले.
पुढे बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून आतापर्यंत युतीसाठी ऑफर आलेली नाही. शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील 68 वर्ष पूर्वगामी चळवळीला दिले आहे आणि या 68 वर्षात त्यांनी कधीही भाजपसोबत युती केली आणि भविष्यात देखील भाजपसोबत शरद पवार युती करणार नाही त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे मात्र पुणे जिल्ह्यातील एक- दोन नेत्यांनी काहींना खुश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली तर मी माझ्या राजकारणाला काही दिवसांकरता विश्रांती देईल आणि यासर्व प्रक्रियेतून बाहेर पडणार असं म्हणत प्रशांत जगताप यांनी इशारा दिला आहे. तसेच युती झाली तर यासर्व प्रक्रियेतून बाहेर पडून पक्षावर किंवा पक्षनेतृत्वावर कोणतीही टीका- टिप्पणी करणार नाही, कोणाला दोष देणार नाही असं देखील लेट्सअप मराठीशी बोलताना पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? रवींद्र चव्हाण म्हणाले, 2 तारखेपर्यंत युती टिकवायची अन्…
तर दुसरीकडे जर महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढलो तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 23 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा देखील प्रशांत जगताप यांनी लेट्सअप मराठीशी बोतलाना केला.
