Pune : पुणे शहरात बीडीपी झोनमध्ये होत असलेल्या बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या क्षेत्रात सर्रास बांधकामे सुरू असून त्यावरुनच आता पुणे मनपा आणि पुण्यातील कारभाऱ्यांना भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी चांगलेच सुनावले आहे. या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे.
‘पुण्यातील BDP झोन मध्ये बांधकामांना परवानगी नसतानाही सर्रासपणे बांधकामे चालू आहेत. हे कळवूनही पालिका गप्प. कुंपण शेत खात आहे अशी शंका येण्या इतपत गोष्टी चालू आहेत. कारण तक्रारी करूनही काही होत नाही. आपल्या पुणे शहराच्या टेकड्यांचे लचके तोडलेले पाहणे केवळ असह्य झाले आहे. पुण्यातील सर्व कारभाऱ्यांना विनंती आहे की आमचे पुणे बकाल, उध्वस्त करू नये.’ असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
वाचा : कसब्यातील पराभवानंतर पुणे भाजप शहराध्यक्ष बदलाची कुजबूज
महानगरपालिकेच्या हद्दीतील जैव वैविध्य उद्यानांसाठी राखीव जागांवर (बीडीपी) BDP मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे चालू आहेत. यावर कारवाई करावी यासाठी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र पालिका अधिकारी यावर कारवाई करायला धजत नाहीत. याच मुद्द्यावर आता कुलकर्णी यांनी पुण्यातील कारभाऱ्यांना लक्ष्य केले आहे. पण, हे कारभारी कोण, त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
सध्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे कारभारी म्हणवले जात आहेत. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांचा रोख हा चंद्रकांत पाटलांकडे आहे का ? असा प्रश्न आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. कसब्यात पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये चंद्रकांत पाटील हेच जबाबदार असल्याची चर्चा पक्षांतर्गत दबक्या आवाजात सुरु होती. त्यानंतर आता थेट चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आमदार असलेल्या कोथरूड मतदार संघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी थेट निशाणा साधल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
..तर चंद्रकांत पाटलांना पुणे सोडावं लागेल..
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघातील पराभव जरी रासने यांचा असला तरी याचा फटका एकूणच पुणे भाजप पदाधिकारी आणि राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यातही चंद्रकांत पाटलांना तो अधिक बसेल, अशी शक्यता अधिक आहे. चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूरचे. मात्र, त्यांचं पुनर्वसन पुण्यातील कोथरूड या भाजपच्या सुरक्षित विधानसभा मतदारसंघात करण्यात आलं. त्यामुळे या मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या देखील नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याचा अंदाज बांधता येतो.