Vidyanand Bapat Send Legal Notice To Pune Police, PMC Over Ganeshotsav Pollution : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी, वायू आणि कचरा प्रदूषणासोबतच रस्त्यांवरील गणपती मंडपांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. पुण्यातील नागरिक विद्यानंद सुहास बापट यांच्या वतीने कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP), पुणे पोलीस, पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) ही नोटीस पाठवली आहे. गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजे, उच्च क्षमतेच्या ॲम्प्लीफायर आणि लेझर शोवर बंदी घालण्यासह मंडपांची पाहणी करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
’10 दिवस दारू नाही तर, रुग्णालयं भरतील’; पुण्याच्या दारूबंदीवर HC ची मिश्किल टिप्पणी
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त आणि MPCBचे प्रादेशिक अधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा प्रश्न गंभीर होऊ नये, तसेच सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे नागरिकांना आणि आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका नोटिशीत मांडण्यात आली आहे.
डीजे, ॲम्प्लीफायर आणि लेझर शोवर बंदीची मागणी
गणेशोत्सवादरम्यान उघड्या सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेच्या ॲम्प्लीफायर यंत्रणा, डीजे आणि लेझर शोच्या वापरावर संपूर्ण बंदी घालावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ढोल-ताशा पथकांवरही मर्यादा घालण्याबरोबरच रुग्णालये, न्यायालये आणि शाळांच्या परिसरात १०० मीटरचा ‘सायलेन्स झोन’ पाळणे बंधनकारक करण्याची मागणी आहे.
मंडपांमुळे वाहतूक कोंडी; तातडीने पाहणी करण्याची मागणी
गणपती मंडपांमुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, पुणे महापालिकेने सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या मंडपांची तात्काळ पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पादचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना अडथळा ठरणारे मंडप स्थलांतरित करावेत. तसेच सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
फटाके, प्लास्टिक आणि CO₂ कॉन्फेटी कॅनन्सवरही आक्षेप
गणेशोत्सवातील प्रदूषणाचा मुद्दा केवळ ध्वनीप्रदूषणापुरता मर्यादित न ठेवता हवेचे आणि घनकचऱ्याचे प्रदूषण रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. CO₂ कॉन्फेटी कॅनन्स, फटाके आणि प्लास्टिक कचऱ्यावर बंदी आणावी, तसेच रिअल-टाइम डिस्प्ले बोर्ड लावावेत, अशी मागणी नोटिशीत करण्यात आली आहे.
तीन दिवसांची मुदत; अन्यथा अवमान याचिकेचा इशारा
या कायदेशीर नोटिशींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तीन दिवसांच्या आत प्रस्तावित उपाययोजनांची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून या मुदतीत माहिती न दिल्यास मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या कायदेशीर नोटीस प्रक्रियेत ॲड. असीम सरोदे यांच्यासह ॲड. श्रीया आवळे, ॲड. सचिन बानाईत, ॲड. ऋषिकेश पाळवदे, ॲड. सुदर्शन केळगणे, ॲड. तृप्ती गायकवाड, ॲड. आयावराजे भोसले, ॲड. प्रेरणा बनसोडे तसेच कायद्याचे विद्यार्थी शार्दूल उबाळे आणि सानिध्य वेलणकर यांची टीम विद्यानंद बापट यांच्या वतीने काम करत असल्याचे सांगण्यात आले.
