धाकधूक वाढली! GBS आजाराचा पुण्यात आणखी एक बळी; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ

राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे.

Mumbai GBS Case

Mumbai GBS Case

Guillain Barre Syndrome : राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे. आताही पुण्यात या आजाराने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे राज्यात एकूण 192 रुग्ण आहेत. तर 8 मृत्यू झाले आहेत. यातील सात रुग्ण पुण्यातील तर एक मयत रुग्ण सोलापुरातील आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत 91 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 192 पैकी 91 रुग्ण नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील आहेत. तसेच 39 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा, 25 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील तर 8 रुग्ण अन्य जिल्ह्यांतील आहेत.

मोठी बातमी : मुंबईत ‘जीबीएस’ व्हायरसचा शिरकाव; अंधेरीला आढळला पहिला रुग्ण

पुणे मनपा आणि जिल्ह्यातील विविध भागांत सर्वेक्षणाच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. बिबवेवाडीत राहणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला आहे. हा रुग्ण वाहनचालकाचे काम करत होता. काही दिवसांपासून त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्याला पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या रुग्णाला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याची पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. एमआरआय काढण्यात आला. पुढे दुसऱ्या दिवशी त्याला नातेवाईकांनी निपाणीला नेले. परंतु, नंतर रुग्णाचा त्रास वाढल्याने त्याला सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावर जीबीएसचे उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच नातेवाईकांनी डिस्चार्ज घेतला.

पुढे त्याच दिवशी रुग्णाला पुण्यात आणून कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यातच रुग्णाला कार्डिअॅक अरेस्टचा त्रास झाला. रुग्णाला तातडीने सीपीआर देण्यात आला. परंतु, उपचारा दरम्यान मात्र त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मृत्यू अहवालात देण्यात आली आहे.

पाणी उकळून अन्‌ अन्न पूर्ण शिजवून खावं; अन्यथा, GBS चा धोका वाढतोय, डॉक्टरांनी काय सांगितल?

जीबीएस संसर्गजन्य नाही

दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच अर्थात जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.

परिणामी नसांना नियमित कार्य करता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांचे कार्य कमी होते. दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं.

Exit mobile version