पाणी उकळून अन् अन्न पूर्ण शिजवून खावं; अन्यथा, GBS’चा धोका वाढतोय, डॉक्टरांनी काय सांगितल?
GBS Virus : देशभर गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या नव्या गुंतागुंतीच्या आजारामुळे भीतीची लाट आहे. दूषित पाणी व शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. (GBS ) त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो, असं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. पण, शिळे अन्न टाळून पूर्ण शिजलेले अन्न खाल्ल्यास आणि पाणी उकळून पिल्यास या आजाराचा धोका होत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, अजित पवारांनी दिल्या महत्वाच्या सूचना
पुण्यात वास्तव्यास असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील) एक तरुण आजारी पडल्याने पुण्यात उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सोलापुरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल झाला होता. २६ जानेवारीला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ‘जीबीएस’मुळे मृत्यू झालेला तो पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आणि दूषित पाण्याच्या संदर्भात तपासणीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, तो मृत रुग्ण ज्या गावचा आहे, त्या हत्तूर गावातील प्रत्येक व्यक्तीची (लक्षणे असलेल्या व्यक्ती) आरोग्य तपासणी केली जात आहे. पुढील १५ दिवस ही तपासणी सुरू राहील, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ टक्के
सोलापुरात जीबीएस (गुलीयन बॅरे सिंड्रोम) या आजाराच्या एका रुग्णाचा उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या आजाराबद्दल सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली. पण हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.
परिणामी नसांना नियमित कार्य करता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांचे कार्य कमी होते. दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं. सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरु शकतात. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. तसेच वेळेत उपचार केल्यास ९५ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. या रुग्णांच्या उपचारामध्ये शरिरातील प्लाझमा बदलणे, हिमोग्लोबिन वाढवणे व व्हेटींलेटर लावणे हे तीन उपचार करावे लागतात.