Pune News : दसऱ्याच्या दिवशी काल (ता.2 ऑक्टोबर) कोथरूड परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जय भवानी नगरमधील चाळ क्रमांक दोन येथे राहणाऱ्या पायगुडे कुटुंबात किरकोळ वादातून मुलाने वडिलांचा खून (Kothrud Murder Case) केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे असून, आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (३३) याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. तानाजी यांच्या पत्नी सुमन पायगुडे यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
काल दुपारी साधारण बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी तानाजी यांनी मुलाला टीव्ही बंद करून स्वतःच्या डोळ्यात औषधाचे ड्रॉप टाकण्यास सांगितले. यावरून बाप-लेकामध्ये वाद झाला. रागाच्या भरात सचिनने स्वयंपाकघरातील चाकू उचलून वडिलांच्या चेहऱ्यावर व गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि सचिनला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या खुनामुळे परिसरात मोठी दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.