तात्पुरत्या उपयांऐवजी कायमस्वरूपी विकासकामांवर भर देऊन हा रथ चालूच ठेवणार – श्वेता घुले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्वेता घुले यांनी प्रभागाच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासावर भर देत आपले स्पष्ट व्हिजन मांडले.
NCP candidate Shweta Ghule gave information about her vision : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी-उंड्री येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्वेता घुले यांनी प्रभागाच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासावर भर देत आपले स्पष्ट व्हिजन मांडले आहे. “सरपंचपद हा प्रवासाचा छोटा टप्पा होता, आता महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या आणि कायमस्वरूपी विकासाकडे आम्ही पाहत आहोत,” असे त्या म्हणाल्या. प्रभागातील पाण्याच्या गंभीर प्रश्नावर बोलताना श्वेता घुले यांनी 24 तास पाणीपुरवठा हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. केदारेश्वर टाकीवरून प्रभागात पाणी आणण्याचे नियोजन असून, त्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय उपाययोजनांवर सध्या विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पाण्याचा प्रश्न सुटल्यास मेंटेनन्सचा खर्च तब्बल 60 ते 70 टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत काळातील आपल्या कामगिरीचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी विकासकामांवर भर देण्यात आला. डांबरी रस्त्यांऐवजी आरसीसी रस्त्यांची निर्मिती, मूलभूत सुविधांचा विस्तार आणि नियोजनबद्ध कामे ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या बचत गटांचा विशेष उल्लेख करत श्वेता घुले म्हणाल्या की, आज 500 ते 600 महिला एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहेत. उद्योग, व्यवसाय, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक अडचणी अशा अनेक बाबींमध्ये महिलांना या माध्यमातून मदत केली जाते. “टीमवर्क आणि एकत्रित काम करण्याची संस्कृती आम्ही रुजवली आहे,” असे त्या म्हणाल्या.
Video : पुणेकरांना मेट्रो, बस प्रवास मोफत मिळणार; NCP च्या जाहीरनाम्यात दादांची गेमचेंजर आश्वासनं
आरोग्य सुविधांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत काळात उभारलेले आरोग्य केंद्र वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरे पडत आहे. त्यामुळे प्रभागात एक सुसज्ज आणि मोठे रुग्णालय उभारण्याची गरज असून, त्यासाठी ठोस नियोजन करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून नियमित गस्त घालण्याची विनंती करण्यात आली असून त्यामुळे परिसर अधिक सुरक्षित झाल्याचे त्यांनी नमूद केले. राजकीय वाटचालीबाबत बोलताना श्वेता घुले म्हणाल्या की, जन्मापासून राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा नाळेचा संबंध आहे. घर सांभाळून समाजसेवा करणे शक्य असून, एक महिला म्हणून महिलांच्या समस्या त्या अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या कठीण काळातील कामगिरीची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिक, गरजू आणि वयस्कर लोकांसाठी जेवणाचे डबे, औषधे पोहोचवण्याचे काम जीवाची पर्वा न करता करण्यात आले. त्या काळात लोकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष वेधताना श्वेता घुले यांनी महापालिकेच्या शाळांची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले. ई-लर्निंग प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, मुलींच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारती दुरुस्त करून, खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे सुविधा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उंड्री वगळता इतर भागांतील शिक्षणव्यवस्था अत्यंत दयनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. “लोकांनी माझे काम पाहिले आहे. सरपंचपदाच्या काळात केलेली विकासकामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे मी नगरसेवक झाले तर लोकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील, असा विश्वास नागरिकांना आहे,” असे सांगत श्वेता घुले यांनी मतदारांकडून पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
