पाणी, आरोग्य आणि रस्त्यांच्या समस्येवर फोकस; श्वेता घुले यांचं प्रभागासाठी स्पष्ट व्हिजन
प्रभाग क्रमांक 41 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्वेता घुले यांनी नगरसेवक झाल्यानंतरच्या आपल्या व्हिजनची सविस्तर माहिती.
NCP candidate Shweta Ghule gave information about her vision : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहम्मदवाडी-उंड्री प्रभाग क्रमांक 41 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्वेता घुले यांनी नगरसेवक झाल्यानंतरच्या आपल्या व्हिजनची सविस्तर माहिती दिली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि पाण्याच्या गंभीर प्रश्नावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रभागातील नागरिकांना सध्या पाणी, ड्रेनेज, रस्ते, आरोग्य आणि लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा यांसारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं श्वेता घुले यांनी सांगितलं. मागील आठ वर्षांपासून प्रभागाला नगरसेवक नसल्यामुळे नागरी समस्या प्रचंड वाढल्या असून, महापालिकेला कर भरूनही नागरिकांना त्या प्रमाणात सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधताना त्या म्हणाल्या की, आज नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. महिलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतो. “मी स्वतः एक महिला असल्याने ही वेदना मला चांगल्या प्रकारे समजते,” असं सांगत त्यांनी या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट केलं. यापूर्वी नागरिकांच्या मदतीने बोरिंग आणि टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, महापालिकेकडून पाणी विकत घेऊन नागरिकांना पुरवण्यात आलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. रस्त्यांच्या अवस्थेबाबत बोलताना श्वेता घुले म्हणाल्या की, त्यांच्या कार्यकाळात रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात आलं होतं. मात्र सध्या हे रस्ते दुरुस्तीच्या अवस्थेत असून मोठ्या डीपी रोडची तातडीची गरज आहे. यासोबतच ड्रेनेजचा प्रश्नही गंभीर असून, पावसाच्या पाण्याच्या नियोजनाअभावी अनेक वेळा नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
Video : पुणेकरांना मेट्रो, बस प्रवास मोफत मिळणार; NCP च्या जाहीरनाम्यात दादांची गेमचेंजर आश्वासनं
आपल्या भविष्यातील विकास आराखड्याबाबत माहिती देताना श्वेता घुले यांनी लहान मुलांसाठी गार्डन, मोठं रुग्णालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त केला. प्रभागातील अमेनिटीज विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उंड्री गावच्या सरपंचपदाचा अनुभव आपल्या पाठीशी असून, रस्ते विकासामुळे परिसरात डेव्हलपमेंट वाढल्याचं त्यांनी नमूद केलं. राजकीय वारसा आणि अनुभवाच्या जोरावर नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामीण आणि शहरी भागातील समस्या आज जवळपास सारख्याच असल्याचं सांगत, “आम्ही प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधतो, त्यांच्या अडचणी जाणून घेतो आणि त्या चोखपणे सोडवण्याचं काम करू,” असं आश्वासन देत श्वेता घुले यांनी मतदारांना आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.
