रविंद्र चव्हाण : विकासाचे व्हिजन ते जागा वाटप

Ravindra Chavan: मतदारसंघ असलेल्या डोंबिवलीमध्ये भाजपचे तब्बल पंधरा नगरसेवक बिनविरोध निवडून आणलेत. तो एक विक्रम आहे.

  • Written By: Published:
Ravindra Chavan 2

Ravindra Chavan : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची निवड ही पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला नवे बळ देणारी ठरली. कारण राज्यात सर्वाधिक नगरपालिका त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकल्यात, आता महानगरपालिका निवडणुकीत ते पायाला भिंगरी लावल्यासारखे राज्यात फिरून कार्यकर्त्यांना बळ देताय. अनेक ठिकाणी भाजपने (BJP) बिनविरोध नगरसेवक निवडून आणले. रविंद्र चव्हाण यांनी स्वत:च्या बालेकिल्ल्यात, मतदारसंघ असलेल्या डोंबिवलीमध्ये भाजपचे तब्बल पंधरा नगरसेवक बिनविरोध निवडून आणलेत. तो एक विक्रम आहे. त्यांनी डोंबिवलीचा विकास कसा केलाय हे पाहुया…

चव्हाणांचा राजकीय प्रवास

रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी खरा आदर्श असा आहे. चव्हाण 2002 मध्ये भाजपा युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हा अध्यक्षपदी नियुक्त झाले. 2005 मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन त्यांनी स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवलीय. 2009 पासून डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजयी झाले . 2016-2019 या काळात ते बंदरे, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि अन्न-नागरी पुरवठा विभागांचे राज्यमंत्री होते. नंतर 2022-24 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी 92 हजार कोटींहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिल्याचे पाहायला मिळाले. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर चव्हाण यांनी पक्षाच्या संघटन पर्वात ऐतिहासिक योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपाची प्राथमिक सदस्य संख्या 1.5 कोटींवर पोहोचली, ज्यामुळे पक्ष राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरलाय.

एकनाथ शिंदेंना शह
तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्याच्या दृष्टीने रविंद्र चव्हाण यांना प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लावून अधिकच बळ देण्याचे काम केलंय.
मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी त्यांची नियुक्ती ही पक्षाच्या दूरदृष्टीचा भाग मानली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि संघाच्या मजबूत पाठिंब्याने पुढे आलेले चव्हाण हे भाजपाच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी आहे.


डोंबिवलीत पायाभूत सुविधा

रविंद्र चव्हाण यांनी परिसरातल्या युवकांचं करियर डोंबिवलीतच घडावं या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ॲमेझॉन डेटा सेंटर आणि प्रामुख्याने आयटी हब असे दोन महत्त्वाचे प्रकल्प येण्यासाठी मेहनत घेतली. तत्पूर्वी
चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीच्या पायाभूत सुविधा विकासात नेहमीच पुढाकार घेतलाय. ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर रोड ओव्हर ब्रिज, डोंबिवली स्थानकाजवळ पार्किंग सुधारणा, समांतर रस्ते पूर्ण करणे आणि काँक्रीट रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेणे अशा अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली. स्थानिक पातळीवर रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 15 जागा बिनविरोध

कल्याण डोंबिवली महापालिका ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाते. कारण शिवसेना गेली तीस वर्षे सत्तेत आहे त्यामुळे यंदा ज्यांच्या खांद्यावर या पालिकेची धुरा असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. युतीला स्थानिक पातळीवर इथं मोठ्या प्रमाणात विरोध असतानाही शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या युती झाली. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागांपैकी शिवसेना शिंदे गट 68 जागा लढणार आहेत. तर भाजपच्या वाट्याला 54 जागा आल्या आहेत. युतीत 14 जागा कमी मिळूनही भाजपचे 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्याची किमया चव्हाण यांनी केलीय. यामागे चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचे आणि रणनीतीचे उत्तम उदाहरण मानले जातंय. डोंबिवलीतील या ‘वाघा’ने स्थानिक पातळीवर आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ‘रवीदादा’ किंवा ‘आपला रवी’ असे प्रेमळ नाव असलेले चव्हाण हे कार्यकर्त्यांशी थेट जोडलेले नेते म्हणून ओळख निर्माण केली आहे .

चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपा महाराष्ट्रात अधिक बळकट होईल, अशी खात्री पक्ष नेत्यांनी व्यक्त केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचे संघटन कौशल्य आणि रणनीती निर्णायक ठरेल. सामान्य कार्यकर्त्यापासून प्रदेशाध्यक्षपर्यंत पोहोचलेले चव्हाण हे भाजपाच्या ‘राष्ट्र प्रथम, पक्ष दुसरा, स्वतः शेवटी’ या तत्त्वाचे खरे प्रतिरूप आहेत. रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती आणि कल्याण-डोंबिवलीतील बिनविरोध यश हे भाजपाच्या ठाणे-कल्याण पट्ट्यातील जनसंघ काळातील प्रभाव पुनरुज्जीवित होत असल्याचं मानलं जातंय.

follow us