Pune Sex Racket : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा राजगड (Pune) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा टाकून 13 तरुणींची सुटका केली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपासून या रिसॉर्टमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास भाग पाडले जात असल्याचा संशय होता. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पथकाने छापा टाकला. यावेळी महिलांकडून 1,000 रुपयांच्या मोबदल्यात देहव्यापार करून घेतला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
छापेमारीदरम्यान पोलिसांनी रिसॉर्टची तपासणी केली असता, तिथे असलेल्या 13 तरुणींची सुटका करण्यात आली. या तरुणी मुंबई, ठाणे, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या विविध भागांतील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना या व्यवसायात कशा प्रकारे आणण्यात आले, त्यांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले होते का आणि त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला गेला का, याचा तपास पोलीस करत आहेत.
क्लिपमागचं सत्य शोधून दाखवा, ऑडिओ बॉम्बवरून मनोज जरांगेंचं फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज
या प्रकरणात वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी यांच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. महिलांना रिसॉर्टपर्यंत आणण्यामागे कोणती यंत्रणा कार्यरत होती, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, संबंधित रिसॉर्ट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मालकीचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पदाधिकाऱ्याने रिसॉर्ट दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, रिसॉर्टचा मालक कोण आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. रिसॉर्टची मालकी आणि व्यवस्थापन यांची माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्रपणे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सुटका करण्यात आलेल्या तरुणींना या व्यवसायात सहभागी करून घेणारे नेमके कोण, त्यामागे आर्थिक व्यवहार कसे होत होते आणि या रॅकेटला आणखी कोणाचे पाठबळ होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. रिसॉर्टच्या व्यवस्थापनाची भूमिका काय होती, याचीही चौकशी केली जात आहे. मुख्य सूत्रधार फरार असल्याने या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
